प्रतिनिधी / सरवडे
डिगस ता. राधानगरी येथील पोलीस पाटील रुपेश पांडुरंग पाटील (वय २७) यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. आज पहाटे त्यांच्या घराशेजारी रस्त्याच्या बाजूला त्यांचा मृतदेह आढळला. शवविच्छेदनात त्यांच्या शरीरात अल्कोहोलचे प्रमाण अधिक आढळल्याने अतिमद्य सेवनाने त्यांचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा अहवाल आहे. राधानगरी पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुपेश पाटील हे काल रविवारी राधानगरी येथे गेले होते. रात्री उशीरापर्यंत न आल्याने त्यांचे वडील तुकाराम पाटील यांनी त्यांना फोन केला असता मी राधानगरीत आहे. आता यायची सोय नसल्याने मी सकाळी येतो असे त्यांनी सांगितले होते. मात्र पहाटे पाच वाजता घराशेजारी दाजीपुर-कारीवडे रस्त्याकडेला ती निपचीत पडल्याचे आढळले. खाजगी वाहनातून त्यांना राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुपेश पाटील यांची दोन वर्षापूर्वीच पोलीस पाटील म्हणून निवड झाली होती यासाठी त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता.