वैज्ञानिक नियतकालिकाच्या अहवालातील निष्कर्ष, मानवी स्पर्शच कारणीभूत
कोरोना विषाणूचा प्रसार डासांमुळे होत नसल्याचा निष्कर्ष एका व्यापक सर्वेक्षणानंतर काढण्यात आला आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. डास आणि कोरोना यांच्यातील संबंधांविषयीचे हे पहिलेच सर्वेक्षण आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील एक महत्त्वाची भीती नष्ट होण्यास साहाय्य मिळणार आहे.
जगभरात कोरोनाचा झपाटय़ाने प्रसार होत असल्याने तो डासांमुळे होत असल्याची शक्मयता अनेक तज्ञांनीही व्यक्त केली होती. तथापि, या विषयावर संशोधकांमध्ये एकमत नव्हते. 15 जून ते 1 जुलै या कालावधीत अमेरिका व ब्रिटनमध्ये अनेक अभ्यास गटांनी व्यापक सर्वेक्षण केले. डास अधिक असलेल्या भागात कोरोनाचा अधिक प्रसार होतो का? याचेही परीक्षण करण्यात आले. मुख्य अभ्यास अमेरिकेतील कान्सास राज्य विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे.
निष्कर्ष नकारात्मक

डासांचा आणि कोरोना प्रसाराचा कोणताही संबंध नसल्याचे या अभ्यासात दिसून आले. कोरोनाचा प्रसार मानवी स्पर्शामधूनच होतो. तसेच मानवाच्या नाकातून अगर मुखातून हवेत पसरणाऱया कोरोना विषाणूंच्या पुंजक्मयांमुळे अन्य व्यक्तींना कोरोनाची बाधा होऊ शकते. शिंक अगर खोकला याद्वारे कोरोनाबाधित व्यक्तीच्या मुखातून आणि नाकातून हवेत कोरोना जंतू पसरतात. त्यानंतर ते हवेत काही काळ जिवंत तरंगत राहू शकतात. अशा स्थितीत ते अन्य व्यक्तीच्या श्वासोच्छवासाद्वारे तिच्या श्वसनयंत्रणेत शिरल्यास तेथे त्यांची वाढ झपाटय़ाने होऊन फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
हाताचाही स्पर्श कारणीभूत

कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास अगर कोरोनाबाधित व्यक्तीने हाताळलेल्या वस्तू निरोगी व्यक्तीने हाताळल्यास व हात स्वच्छ न करता ते नाक, तोंड अगर त्यांच्या जवळच्या चेहऱयाच्या भागांना लावल्यास कोरोनाची लागण निरोगी व्यक्तीला होऊ शकते. मात्र, कोरोनाबाधित व्यक्तीला डास चावल्याने व तोच डास निरोगी व्यक्तीस चावल्यास कोरोनाची बाधा होऊ शकत नाही, असे आता निश्चितपणे म्हणता येऊ शकते, असे तज्ञांनी म्हटले आहे.
सवयी टाळणे आवश्यक
नकळत माणसाचा हात मिनिटाला सरासरी तीन वेळा याप्रमाणे त्याच्या चेहऱयाला लागत असतो. ही सवय मोडणे आता आवश्यक बनले आहे. चेहऱयाला हात लागू न दिल्यास किंवा लावायचा असल्यास तो सॅनिटायझर किंवा साबणाने स्वच्छ करून लावल्यास कोरोनाचा प्रसारावर निर्णायक नियंत्रण मिळवणे शक्मय आहे. यावरही आता संशोधकांनी निश्चिती व्यक्त केली आहे.
बळींचा आकडा 1.40 लाख पार

वॉशिंग्टन : कोरोना बळींचा अमेरिकेतील आकडा 1 लाख 40 हजारच्या वर पोहोचला आहे. गेले तीन आठवडे प्रत्येक सप्ताहात 5 हजारहून अधिक बळी पडत आहेत. शनिवार सकाळ ते रविवार सकाळ या 24 तासांत 72 हजारहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. न्यूयॉर्कमधील रुग्णसंख्या कमी होत असली तरी अन्य शहरांमध्ये ती वाढत आहे. अमेरिकेत आता शवागारांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे एका शवागारात जास्त संख्येने मृतदेह ठेवण्यासाठी अंतर्गत रचना बदलण्याचे काम सुरू आहे. एक तृतियांश या प्रमाणात अधिक जागा उपलब्ध करून घेण्यासाठी रुग्णालये प्रयत्नशील आहेत.
राष्ट्रीय आपत्ती घोषित

जोहान्सबर्ग : कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे लक्षात घेता दक्षिण आफ्रिका सरकारने ही राष्ट्रीय आपत्ती असल्याची घोषणा केली आहे. आवश्यकता असल्यास या घोषणेला कालावधी वाढही देण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिका देशाच्या 16 प्रांतांमध्ये कोरोना स्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे आहेत. प्रशासनाने विविध उपाय राबविले असून जुन्या औषधांचा प्रयोग रुग्णांवर मोठय़ा प्रमाणात करण्यास प्रारंभ केला आहे. सामाजिक संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अर्थव्यवस्थेचा श्वास कोंडला

रिओ डि जानेरिओ : कोरोनाच्या अनपेक्षित संकटामुळे ब्राझिलच्या अर्थव्यवस्थेचा श्वास अक्षरश: कोंडला असल्याची कबुली अध्यक्ष जाईर बोल्सोनारो यांनी दिली आहे. बेकारी मोठय़ा प्रमाणावर पसरली असून पैशाविना लोकांचे हाल होत आहेत. अनेकांजवळ अन्न विकत घेण्यासाठीही पैसा उरलेला नाही. लॉकडाऊन उठविल्यास रोगप्रसार वाढतो आणि लॉकडाऊन कायम ठेवल्यास अर्थव्यवस्थेची गळचेपी होते, अशा विचित्र कोंडीत आपला देश सापडल्याचे त्यांनी म्हटले आहे. सामाजिक अंतराचा नियम लोक पायदळी तुडवत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
इस्रायलमध्ये निदर्शने
तेल अविव : इस्रायलच्या सरकारने कोरोना स्थिती योग्य स्थिती योग्यप्रकारे न हाताळल्याचा आरोप करत राजधानी तेल अविव येथे अनेक सामाजिक संघटनांनी निदर्शनांचे आयोजन केले आहे. ही निदर्शने रविवारी सकाळपासून सुरू झाली. सरकारची उपायशक्ती कुंठीत झाली असल्याचा आरोप निदर्शकांनी केला. पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या निवासस्थानासमोर शेकडो निदर्शकांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना पाण्याचे फवारे वापरावे लागले. दोन निदर्शकांना अटक करण्यात आली असून नेत्यानाहू यांनी शांततेचे आवाहन केले आहे. इस्रायलमध्ये गेल्या पंधरवडय़ात रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे.
चीनचे उपचार दल दाखल

बीजिंग : चीनच्या झिनजियांग प्रांतात कोरोनाचा उदेक झाल्याने चिनी प्रशासनाने तेथे 500 तज्ञ डॉक्टरांचे पथक त्वरित पाठविले आहे. प्रतिदिन 100 या प्रमाणात या प्रांतात रुग्णसंख्या वाढू शकेल, असा अंदाज आरोग्य तज्ञांनी व्यक्त केल्यामुळे चीन प्रशासनाने प्रारंभापासूनच दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये आतापर्यंत 83 हजार 660 रुग्ण सापडले असून 4 हजार 634 जणांचा मृत्यू झाला आहे. झिनजियांग प्रांतात इतर प्रांतांच्या तुलनेत उशिरा लागण झाली आहे.
व्हिक्टोरिया प्रांतात उदेक

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतात गेले दोन आठवडे प्रतिदिन 200 हून अधिक रुग्ण आढळत असल्याने प्रशासन चिंताग्रस्त झाले आहे. ऑस्ट्रेलियातील दुसऱया क्रमांकाचे शहर मेलबर्न येथे मास्कची सक्ती करण्यात आली असून तो न घालणाऱयास 200 ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड ठोठावण्यात येत आहे. संपूर्ण व्हिक्टोरिया प्रांतातच मास्क व सामाजिक अंतर अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रांताची लोकसंख्या साधारणत: 50 लाख असून त्या तुलनेत कोरोनाबाधितांची संख्या जास्त असल्याने विशेष काळजी घेण्यात येत आहे.









