मराठीतही सातत्याने नव्या अभिनेत्रींची एंट्री होत आहे. ‘टकाटक’या चित्रपटातून रितिका श्रोत्रीने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. आता तिचा नवा चित्रपट चर्चेत आहे.
हिंदीमध्ये नेहमीच नवनव्या अभिनेत्रींची एंट्री होत असते. काही अभिनेत्री छाप पाडण्यात यशस्वी ठरतात तर काहींना संघर्ष करावा लागतो. गेल्या वर्षी ‘टकाटक’ या चित्रपटातून रितिका श्रोत्रीने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. रितिकाच्या अभिनयाचं बरंच कौतुक झालं. हा चित्रपटही चांगलाच गाजला. रितिकाच्या रुपाने आणि अभिनयकौशल्याने प्रेक्षकही प्रभावित झाले. मधल्या काळात रितिका रुपेरी पडद्यावर फारशी दिसली नव्हती. पण आता ती ‘डार्लिंग’मधून रुपेरी पडद्यावर येणार आहे. मध्यंतरी या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. समीर पाटील या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. ‘डार्लिंग’च्या निमित्ताने रितिकाला आणखी एक आव्हानात्मक भूमिका मिळाली आहे. आता ही भूमिका रितिका कशी निभावणार हे पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे. समीर पाटीलने ‘चौर्य’, ‘यंटम’ आणि ‘वाघेर्या’सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाला चिनार-महेश यांचं संगीत असेल. ‘डार्लिंग’मधल्या इतर कलाकारांची नावं अद्याप घोषित झालेली नाहीत. ‘टकाटक’मध्ये रितिकाचे लटकेझटके बघायला मिळाले होते. आता ‘डार्लिंग’मध्येही असंच काही तरी बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या पोस्टरला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘डार्लिंग’ प्रदर्शित झाल्यानंतर आपण प्रेक्षकांची डार्लिंग होऊ, अशी आशा रितिकाला वाटत असल्यास नवल नाही.









