इंटरनेट आज प्रत्येक व्यक्ती वापरत आहे. ह्या इंटरनेटद्वारे विविध सायबर क्राईम घडत आहेत. सर्वसाधारणपणे पैशाचे फ्रॉड, सोशल मीडियाद्वारे बदनामी, खोटय़ा लिंक्स पाठवून फसवणे इ. प्रकार घडत आहेत. मात्र ह्याच इंटरनेटचा वापर करुन ऑनलाइन ड्रग विक्री, पोर्नोग्राफी, हॅकिंग आणि सर्वसाधारण कायदा व नियमांच्या विरुद्ध असलेल्या सर्व प्रकारच्या बेकायदेशीर गोष्टीही केल्या जात आहेत. मग प्रश्न असा पडतो की हे सर्व आपल्याला इंटरनेट सर्फिंग करताना का दिसत नाही, आपल्या नजरेत अशा वेबसाईट का येत नाहीत. तर हे सर्व बेकायदेशीर असल्याने ह्यासाठी नेहमीचे इंटरनेट (जे सर्वसामान्य वापरले जाते) ते न वापरता डार्क नेट किंवा डार्क वेब बेकायदेशीर इंटरनेटचा वापर होतो. मुळात अशा डार्क नेट ब्राऊझ करणे आपल्या देशामध्ये अवैध आहे.
डार्क वेब रहस्यमय
साधारण आपल्याला जे इंटरनेट माहिती आहे किंवा वापरतो ते संपूर्ण वेबच्या जवळ जवळ फक्त 4 टक्के ते 5 टक्के इतके आहे, बाकीचे 95 टक्के पूर्णपणे लपलेले आहे, ह्याच लपलेल्या इंटरनेटला आपण डार्क वेब किंवा डार्क नेट डार्क वेब इंटरनेट म्हणून ओळखतो. जिथे जगभरातून बेकायदेशीर कामे होतात. तसे पाहिले तर डार्क वेब हे पूर्ण सत्य नाही, तर ते आपण विचार करतो त्यापेक्षा कितीतरी अधिक भयावह आणि रहस्यमय आहे. ह्या डार्क वेबचा कंटेंट सतत वाढत आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाने 2001 मध्ये केलेल्या संशोधनानुसार 7 हजार 500 टेराबाइट्सची माहिती उपलब्ध आहे जी आज प्रचंड पटीने वाढली आहे.
डार्क वेब नक्की काय आहे
डार्क वेब जाणून घेण्यापूर्वी, थोडे वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच WWW बद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. वर्ल्ड वाइड वेब तसे पाहिले तर एक जागतिक दर्जाची डिजिटल लायब्ररी आहे, जिथे जगभरातील माहिती वेबपेजच्या नवीन स्वरूपात उपलब्ध आहे. वर्ल्ड वाइड वेब हे ढोबळपणे दोन भागांमध्ये विभागले गेले आहे. “सरफेस वेब’’ आणि “डीप वेब’’. सरफेस वेबमध्ये असलेली माहिती सर्च इंजिनद्वारे सहज शोधता येते.
तसेच गुगल क्रोम किंवा कोणत्याही सामान्य ब्राउझरवरून ते ऍक्सेस करता येते. गुगल, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍप आणि यूटय़ूब किंवा इतर कोणत्याही कंपनीच्या अथवा वेब पोर्टल्ससारख्या लाखो वेबसाइट्स या सरफेस वेबमध्ये आहेत व त्या पाहता येतात. डीप वेबमध्ये युझरला लॉग-इन करावे लागते, माहिती हवी असल्यास युझर नेम पासवर्ड देऊन ती पाहता येते. त्या त्या कंपनीची परवानगी आवश्यक असते.
बेकायदेशीर कामांमध्ये वापर
मात्र ह्या डीप वेबचा एक “काळा भाग’’ देखील आहे जो अत्यंत रहस्यमय आहे. ज्याला आपण “डार्क वेब’’, “डार्क नेट’’ किंवा “ब्लॅक वेब’’ या नावाने ओळखतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, डार्क वेब हाही इंटरनेटचा एक भाग आहे ज्यामध्ये उददुत सारख्या पारंपारिक सर्च इंजिनद्वारे प्रवेश केला जाऊ शकत नाही. इंटरनेट सर्चमध्ये डार्क वेबवर असणारा कंटेंट सापडत नाही. मानवी तस्करी, अंमली पदार्थांची खरेदी-विक्री, शस्त्रास्त्रांची तस्करी यासारख्या बेकायदेशीर कामांमध्ये याचा वापर केला जातो. इथे सर्व बाबी ह्या “एन्क्रिप्ट’’ फॉर्ममध्ये असते तसेच युझर्सची ओळख गुप्त राहते.
डार्क वेबबद्दल अनेकांचा असाही गैरसमज आहे की, डार्क वेब खूप मोठे आहे. पण प्रत्यक्षात असे नाही आहे. डार्क वेब फार मोठे नसते ते खूप छोटे आहे.
2.5 दशलक्ष वेबसाइट्स
वेबच्या आत जास्तीत जास्त 2.5 दशलक्ष वेबसाइट्स आहेत. डार्क वेब हा डीप वेबचा एक छोटासा भाग आहे, परंतु डार्क वेबमध्ये 90 टक्के काम बेकायदेशीरपणे चालते. डार्क वेबमध्ये वेबसाइट विशिष्ट पद्धतीने शोधली जाऊ शकते. सर्च इंजिनने नाही. इथल्या वेबसाईट्सना कोणतेही इंडेक्स नाही (जसे सरफेस वेबमध्ये गुगल इंडेक्स तयार करुन वेबसाइट शोधून देतो) आणि डार्क वेबच्या वापरकर्त्याचा शोध घेणे जवळजवळ अशक्मय आहे. ह्याचे कारण युझरची ओळख लपलेली असते आणि आयपी ऍडेसदेखील बदलतो व बदलत राहतो. त्यामुळे एकूणच ह्यामध्ये सामान्य युझरला काम करणे अवघड आहे. तसे पाहिले तर डार्क वेब ऍक्सेस करण्यासाठी टॉर, वॉटरफॉक्स, सबग्राफ ओएस, आयटूपी, टेल्स, व्होनिक्स, व्हीपीएन अशावरुन ऍक्सेस करता येते. पण प्रश्न असा आहे की काय ऍक्सेस करावे? कारण जसे आपल्या गुगल सर्च इंजिनमध्ये एखादा शब्द/ किवर्ड टाकला की संबंधीत वेबसाइट्सची यादी दिसते तसे इथे डार्क वेबमध्ये नाही. म्हणून म्हटले की हे डार्क वेब ऍक्सेस करणे सोपे नाही. डार्क वेबच्या वेबसाईटसुद्धा सामान्य वेबसाईटपेक्षा विस्ताराने पूर्णपणे वेगळय़ा आहेत. डार्क वेबवरील वेबसाइट्सच्या URL खूप वेगळय़ा आहेत. म्हणजे कांद्याला जसे थर असतात तसे काहीसे इथल्या वेबपेज बाबत म्हणता येईल. या वेबसाइट्सचे डोमेन नावदेखील onion आहे. सिक्मयुरड्रॉप, सेफएस्क्रो, ईल्युड, प्रोपब्लीका, हायस्टेक, टॉर्च, ओनिअनवॅलेट अशी काही वेबसाईट आहेत ज्या बीटकॉईन, डार्कवेबमधील सर्च, स्टिंग पत्रकारिता, टेडींग इ.साठी वापरले जाते.
डार्क वेब वेबसाइटचा मालक किंवा युझर शोधणेदेखील खूप कठीण आहे. कारण त्याच्या आत एक स्तर किंवा नेटवर्क तयार होते, प्रत्येक सेकंदाला युझरचा आयपी बदलत असतो. डार्क वेबवर हॅकर्सची कमतरता नाही. तुम्ही एक शोधलात तर तुम्हाला हजार सापडतील. वास्तविक, हॅकर्स येथे सतत सक्रिय असतात, ज्यांना क्षणार्धात तुमच्या संगणकावरील सर्व डेटा डीलिट, एडीट किंवा ऍक्सेस करण्याची संधी मिळते. जोपर्यंत तुम्ही योग्य हेतूने जात आहात तोपर्यंत तुम्ही खोल जाळय़ात आहात. तुम्ही जस्त ऍक्सेस केले तर तुम्हाला प्रत्येक गुन्हा पहायला मिळेल, मग ते ड्रग्ज विकणे असो किंवा खून, हॅकिंग, शस्त्र विक्री, ऑनलाइन मार्केटिंग, तसेच वापरकर्ते ड्रग्ज, बंदुका, अफू, चरस विकतात आणि खरेदी करतात, इतकेच नाही तर बनावट एटीएम कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट इत्यादीदेखील येथे आढळतात. ह्या इंटरनेटच्या या अंधाऱया जगात इतक्मया वाईट गोष्टी घडतात, घडवल्या जातात किंवा असतात की ऐकून थरकाप उडेल. तसे पाहिले तर डीप वेबवर प्रवेश करणे बेकायदेशीर नाही. पण तुम्ही काही चुकीच्या आणि बेकायदेशीर कामात सहभागी झालात अडकलात तर मात्र ते नक्की बेकायदेशीर आहे. थोडक्मयात डीप वेब आणि डार्क वेब यांच्यात कोणतीही सीमारेषा नाही, जे तुम्हाला सांगते की ते डीप वेब आणि हे डार्क वेब आहे. वास्तविक डार्क वेब हा देखील डीप वेबचा एक भाग आहे जो गुन्हेगारी आणि बेकायदेशीर कार्यांसाठी वापरला जातो. म्हणून इंटरनेट वापरताना, वेबसाईट उघडता, व्हिपीएन वापरताना प्रत्येकाने आपल्या विवेकबुद्धीने काम करावे.
विनायक राजाध्यक्ष, सांगली









