सावंतवाडी:
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील किडणी डायलेसीस सेंटर गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली आहे. सेंटर बंद राहिल्याने गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक फटका बसत आहे. डायलेसीस सेंटरमुळे गरीब रुग्णांना अल्प दरात उपचार मिळत होते. रुग्णसंख्या वाढल्याने डायलेसीस मशिनही वाढविण्यात आल्या. सेंटरमधून रुग्णांना चांगली सेवा मिळत आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून हे सेंटर बंद आहे.
याबाबत संबंधित विभागात संपर्क साधला असता डायलेसीस मशिनला जोडणारा पाण्याचा पाईप फुटल्याने तो दुरुस्तीसाठी सेंटर काही दिवस बंद ठेवण्यात आले आहे. त्याबाबत मशिन कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात कंपनीचे कर्मचारी येऊन नवीन पाईप जोडणी करणार आहेत. हा तांत्रिक दोष दूर केल्यानंतर डायलेसीस सुविधा रुग्णांना मिळणार आहे, असे सांगण्यात आले.
याबाबत जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याशी संपर्क साधत लक्ष वेधले.








