डांभेवाडी येथील प्रकार; दोघांना अटक
सातारा / प्रतिनिधी
खटाव तालुक्यातील डांभेवाडी येथे ग्रामपंचायत मतदान प्रक्रिया सुरु असताना बेकायदेशीरपणे जमाव जमवून मतदारांवर दबाव टाकत गोंधळ घालणाऱ्या पाचजणांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निलेश जाधव, साईनाथ जाधव, संदीप पवार, रोहित पवार, सुरेश उर्फ बाबू यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. यापैकी साईनाथ आणि संदीप या दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत वडूज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खटाव तालुक्यातील डांभेवाडी येथे शुक्रवार, दि. 15 रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. ग्रामंपचायत कार्यालयासमोर असणाया डांभेवाडी ते यलमरवाडी रस्त्यावर एका मतदान केंद्रावर मतदान सुरु होते. मात्र, दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या बाहेर गावातील मतदार नसलेल्या निलेश जाधव, साईनाथ जाधव, संदीप पवार, रोहित पवार, सुरेश उर्फ बाबू बाळू उर्फ बापू जाधव (सर्व रा. वडूज, ता. खटाव) या पाचजणांनी बेकायदेशीर जमाव जमवून डांभेवाडी येथे मतदारांवर दबाव टाकला तसेच गोंधळही घातला. दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्यापैकी निलेश याला सीआरपीसी अंतर्गत यापूर्वी नोटीसही बजावण्यात आली आहे.
त्यामुळे त्याला पोलीस हवालदार सागर बदडे यांनी ‘तू येथे का आला आहे.? अशी विचारणा केली असता ‘आम्ही येथून जाणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा,’ असे पोलीस हवालदार बदडे यांना सांगत त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी समवेत असणाऱ्यांनीही गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी या सर्वांना ताब्यात घेत असताना पोलिस हवालादारांना धक्काबुक्की करत त्यांचे कर्तव्य पार पाडण्यापासून रोखत शासकीय कामात अडथळा आणला.
दरम्यान, या घटनेनंतर डांभेवाडी परिसरात तणाव निर्माण झाला होता. परिणामी वडूज पोलीस ठाण्यातील हवालदार सागर दिगंबर बदडे (वय 27) यांनी या पाचजणांच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणला असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर करत आहेत.









