कणबर्गी परिसरातील घटना : वासरासह बकरी जखमी
प्रतिनिधी / बेळगाव
कणबर्गी परिसरातील विविध समस्या सोडविण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने रहिवाशांना नाहक त्रास होत आहे. मात्र काही अडचणींचा सामना येथील जनावरांनाही करावा लागत आहे. ग्लास हाऊस परिसरात ठेवण्यात आलेला डांबर ऊन्हामुळे वितळून पसरला आहे. पण चरावयास गेलेली जनावरे यामध्ये अडकल्याने वासरू व बकरी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
कणबर्गी परिसरातील विविध रस्त्यांचा विकास महापालिका व स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. पण लॉकडाऊनमुळे विकासकामे बंद आहेत. कणबर्गी परिसरातील विविध समस्यांमुळे नागरिकांसह जनावरांनादेखील अडचणी निर्माण होत आहेत. येथील तलावाचा विकास करताना जनावरांना पाणी पिण्यास मज्जाव केल्याने शेतकऱयांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण आंदोलन छेडल्यानंतर जनावरांना पाणी पिण्यासाठी तलावाशेजारी सोय करण्यात आली. तसेच कणबर्गी परिसरातील 164 एकर जमीन संपादन केल्याने शेतकरी भूमिहीन झाले आहेत. तसेच जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा विविध समस्यांचा सामना करताना आता विकासकामे शेतकऱयांच्या मुळावर बसली आहेत.
ऊन्हामुळे बॅरेलमधील डांबर वितळला
रस्त्याच्या विकासासाठी आणलेले डांबराचे बॅरेल कणबर्गी येथील ग्लास हाऊस परिसरात ठेवण्यात आले होते. पण ऊन्हामुळे काही बॅरेलमधील डांबर वितळून पसरले आहे. या परिसरातून जनावरे चरावयास जात असतात. पण वितळलेल्या डांबरामध्ये काही जनावरे अडकून पडल्याची घटना घडली आहे. वितळलेल्या डांबरामध्ये गायीचे वासरू तसेच बकरी अडकून पडल्याने पायाला जखम झाली आहे. शेतकऱयांना तसेच बकरी मालकांना मोठा फटका बसला आहे. याठिकाणी पसरलेल्या डांबरामुळे जनावरांचा जीव जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानभरपाईला जबाबदार कोण? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. याची पाहणी करून जनावर मालकांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच पसरलेल्या डांबराचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.









