प्राचीन काळी एका वनात एक ऋषी राहत होते. ते खूप तेजस्वी होते. त्यांच्या आश्रमात बरेच शिष्य शिकत असत. चौस÷ विद्या शिकवल्यावर ऋषी त्या शिष्यांची परीक्षा घेत असत. बारा वर्षे प्रत्येक शिष्य सर्व विद्या शिकत असत.ऋषींच्या गुरुकुलात सर्व शिष्य हे समान असत. त्यांचे प्रत्येकावर जीवापाड प्रेम असे. आपल्या शिष्यांनी मनुष्यजन्माचे सार्थक करावे एवढीच त्यांची अपेक्षा आणि हीच त्यांची गुरुदक्षिणा असे. ऋषींच्या गुरुकुलातील शिक्षण पद्धतीमुळे त्यांचा नावलौकिक सर्वत्र होऊ लागला.
त्या आश्रमात एक राजपुत्र आणि एक सामान्य कुटुंबातील मुलगा शिक्षण घेत होते. त्या दोघांची खूप घट्ट मैत्री जमली. दोघेही एकमेकांचे जिवलग मित्र बनले. त्यांच्या मैत्रीची सगळय़ा आश्रमात चर्चा होत असे. ऋषीसुद्धा त्यांच्या मैत्रीचा आदर्श इतर शिष्यांना घेण्यास सांगत असत. कालांतराने ऋषींच्या आश्रमातील शिक्षण पूर्ण झाले आणि परीक्षेची वेळ आली. ऋषींनी सर्व शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले. सर्व शिष्य खूप उत्साहात आणि आनंदात होते. परीक्षेचा दिवस जवळ आला आणि ऐनवेळी ऋषींनी सांगितले की, सगळय़ा शिष्यांची परीक्षा घेतली जाईल. पण राजपुत्र आणि त्याच्या मित्राची परीक्षा मात्र पुढील 12 वर्षांनी घेण्यात येईल. ऋषींच्या या निर्णयामुळे सगळे आश्चर्यचकित झाले. काहींना वाटले की पुढील 12 वर्षे पुन्हा या दोन शिष्यांना गुरुकुलात राहावे लागणार आहे की काय? पण तसे झाले नाही. परीक्षा पूर्ण झाली सगळे विद्यार्थी आपापल्या घरी गेले. मात्र या दोन्ही शिष्यांच्या मनात संभ्रम होता. त्यांनी ऋषींकडे याबाबत विचारले. ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि आश्रम सोडण्यास सांगितले. ऋषींची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांनी आपापल्या घरी जायचे ठरवले. आश्रम सोडण्यापूर्वी दोघेही मित्र खूप दुःखी झाले. कारण, आयुष्यात पुन्हा त्यांची भेट कधी होईल हे त्यांनाही सांगता येत नव्हते. राजपुत्र त्याच्या राज्यात गेला आणि त्याचा मित्र त्याच्या घरी गेला. काही कालावधीनंतर राजपुत्र राजा झाला आणि त्याचा मित्र एका दुसऱया राज्याचा प्रधान झाला. राजपुत्र राजा झाल्याने त्याने राज्य करण्यास सुरुवात केली. तो उत्तम प्रशासक बनला. त्याने त्याच्या राज्यातील जनतेची सेवा करण्यास सुरुवात केली. परंतु, त्याला त्याच्या कर्तृत्वाचा अहंकार झाला. राजा कोणालाही जुमानत नसे. त्याचा अहंकार दिवसेंदिवस वाढतच गेला आणि तो प्रजेवर जुलूम करू लागला. राजाची कीर्ती होण्याऐवजी अपकीर्ती होऊ लागली. दुसरीकडे प्रधान पद मिळवलेल्या त्याच्या मित्राचीही तीच अवस्था झाली. त्याचा मित्र एका सामान्य कुटुंबातला होता पण त्याने स्वतःच्या गुणांच्या, बुद्धिमत्तेच्या जोरावर राज्यातील सर्वोच्च स्थान मिळवले होते. त्याला स्वतःच्या कर्तृत्वाचा खूप अहंकार झाला. तो त्याचे कुटुंबीय, नातेवाईक यांच्याशी दुर्व्यवहार करत असे. त्यामुळे त्याचे कुटुंबीय प्रजा दुःखी झाली. प्रधानाची प्रतिमा त्याच्या आप्तस्वकीयांमध्ये चांगली नव्हती.
एकेकाळी ऋषीं ज्या वनात राहत असत तेथे खूप मोठा दुष्काळ पडला. ऋषींना आश्रमातील शिष्यांचे संगोपन करणे कठीण जाऊ लागले. ऋषींनी त्यांच्या काही शिष्यांना राजाकडे मदत मागण्यास पाठवले. शिष्यांनी राजाला ऋषींनी दिलेली आज्ञा सांगितली आणि राजाला मदत करण्यास विनवले. राजा स्वतःच्याच अहंकारात होता. त्याला आपण एकेकाळी ऋषींच्या आश्रमात शिकत होतो हे तो विसरला. त्याने ऋषींची आज्ञा धुडकावून लावली. राजाने ऋषींच्या शिष्यांना हाकलून दिले आणि पुन्हा राज्यात न येण्यास सांगितले. शिष्यांनी घडलेला सगळा प्रकार ऋषींना सांगितला. ऋषींना खूप दुःख झाले आणि त्यांनी शिष्यांना दुसऱया राज्याच्या प्रधानाकडे मदत मागण्यास पाठवले. शिष्य दुसऱया राज्याच्या प्रधानाकडे गेले आणि त्यांनी ऋषींची आज्ञा प्रधानाला सांगितली. प्रधानाच्या डोळय़ावरसुद्धा अहंकाराची पट्टी असल्याने त्यानेही ऋषींची आज्ञा धुडकावून लावली. ऋषींच्या सगळय़ा शिष्यांना अपमानित केले आणि त्यांच्याशी दुर्व्यवहार केला. पुन्हा ऋषींना घडलेला प्रकार शिष्यांनी सांगितला. ऋषींनी शिष्यांना धीर दिला आणि परिस्थिती बदलणार असल्याचे सांगितले.
काही वर्षांनी अहंकारी राजाच्या राज्यातील प्रजेने त्याला राज्यातून हाकलून लावले. राजाचा वध करायचा असे प्रजेने ठरवले. राजा राज्य सोडून पळून गेला. प्रजाजन त्याचा शोध घेत होते. त्यांना राजावर सूड उगवायचा होता. तर, दुसरीकडे प्रधानाच्या दुर्वर्तनामुळे त्रस्त होऊन त्याचे कुटुंबीय त्याला सोडून गेले होते. प्रधान एकटा पडला होता. त्याचे एकटेपण हे त्याला मृत्युसमान भासत होते. त्याने त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यास सुरुवात केली. राजा स्वतःचा जीव वाचवण्याकरिता राना-वनात फिरत होता. प्रधानही राना-वनात कुटुंबीयांचा शोध घेत होता. अचानक त्या दोघांची जंगलात गाठ पडली आणि त्यांनी एकमेकांना ओळखले. बऱयाच वर्षांनंतर दोन जिवलग मित्र भेटल्याने त्यांनी एकमेकांना मिठी मारली. त्या दोघांचे कंठ भरून आले. त्यांनी आश्रमात जाऊन ऋषींना आपल्या गुरुंना भेटायचे ठरवले. त्याप्रमाणे ते दोघेही आश्रमात गेले. ऋषींनी त्यांचे मनापासून स्वागत केले. ऋषींना त्यांनी सगळय़ा घडलेल्या घटना सांगितल्या. ऋषींनी त्यांचे दुःख समजून घेतले आणि त्यांच्या दुःखाचे मूळ त्यांच्या अहंकारात दडलेले आहे हे सांगितले. परमेश्वराच्या राज्यात सगळे जीव समान आहेत, कोणीही उच्च नाही आणि कोणीही लहान नाही. मनुष्याने मनुष्यालाच जर सन्मान दिला नाही तर आपण मनुष्य म्हणवून घेण्याच्या पात्रतेचा राहणार नाही. मग परमेश्वरी कृपा आपल्याला कशी प्राप्त होणार?’ त्या दोघांचेही डोळे उघडले आणि ऋषींसमोर त्यांनी केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त घेतले. त्यावषी बरोबर 12 वर्षे पूर्ण झाली होती आणि ते दोघेही ऋषींच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले होते. श्रीसमर्थ व्यवस्थापन शास्त्रातील सन्मानविषयक गरजांविषयी अतिशय समर्पक गरजांविषयी सत्त्वगुण लक्षणात असे म्हटले आहे की, शांती क्षमा आणि दया । निश्चये उपजे जया । सत्त्वगुण जाणावा तया ।अंतरी आला ।। तडीतापडी दैन्यवाणें ।आलें आश्रमाचेनि गुणें! तयालागी स्थळ देणें ।तो सत्त्वगुण ।। होणार तैसें होत जात ।प्रपंची जाला आघात । डळमळीना ज्याचें चित्त । तो सत्त्वगुण ।। 52- 53-57/07/02 याचा अर्थ असा आहे की, शांती, क्षमा आणि दया हे ज्याच्या वागण्यात दिसू लागतात, भगवंताच्या भक्तीचा निश्चय ज्याच्या मनात उत्पन्न झाला आहे त्याच्यात सत्त्वगुण वाढीस लागला आहे असे समजावे. कुणीही दुःखी, दरिद्री जीव आश्रयास आला असता जो त्यास गृहस्थाश्रमाचे कर्तव्य म्हणून आश्रय देतो त्यास सत्त्वगुण असे म्हणावे. जे व्हायचे ते होणारच आहे या नियमानुसार जो वागतो आणि प्रपंचामध्ये कितीही मोठे संकट आले तरीही जो शांतचित्त राहून स्वतःचे मन डळमळू देत नाही तो सत्त्वगुण होय. व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टीने या ओव्यांचा विचार केल्यास असे जाणवते की, कुठल्याही उद्योग समूहात शांती, क्षमा आणि दया हे तीन गुण असलेले अधिकारी, कर्मचारी, संचालक आणि कामगार आहेत तो उद्योग समूह निश्चितच प्रगती करतो. ज्या उद्योग समूहात गरजवंतांना सन्मान देऊन वागवले जाते किंवा नोकरी देण्यात येते तेथे उत्तम व्यवस्थापनाची निर्मिती झाली आहे असे समजावे. जे घडायचे आहे ते कुणीही टाळू शकत नाही या नियमानुसार उद्योग समूहावर आलेल्या संकटाशी जे अधिकारी, कर्मचारी, कामगार किंवा संचालक धैर्याने सामना करतात तेच उत्तम पद्धतीने उद्योग समूहास भरभराट आणून देऊ शकतात. श्रीसमर्थांनी सत्त्वगुण लक्षण समासात सन्मान विषयक गरजांविषयी जे सांगितले आहे ते जर आत्मसात केले तर निश्चितच त्याचा फायदा उद्योग समूह आणि संबंधित संस्थेला होऊ शकतो.
माधव किल्लेदार








