वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मेक्सिकोतील कॅनकून येथे 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या डब्ल्यूटीए फायनल्स महिलांच्या टेनिस स्पर्धेसाठी विम्बलडन ग्रँडस्लॅम विजेती मर्केटा व्होंड्रोसोव्हाने आपली पात्रता सिद्ध केली आहे. आता या स्पर्धेत व्होंड्रोसोव्हा, टॉप सिडेड सबालेंका, पोलंडची इगा स्वायटेक, अमेरिकेची कोको गॉफ आणि जेबॉर यांचा सहभाग राहिल.
प्रत्येक वर्षाच्या टेनिस हंगामाच्या अखेरीस डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धा भरविली जाते. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत केवळ जगातील सर्वोत्तम आठ अव्वल टेनिसपटूंना संधी दिली जाते. 2021 ची डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धा गुडालजेरा येथे झाली होती. या स्पर्धेत अमेरिकेची कोको गॉफ आणि जेसिका पेगुला या एकेरीत सहभागी होणार नसून त्या दुहेरीत खेळणार आहेत. कजाकस्थानची सबालेंका जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाली असली तरी तिला कडव्या प्रतिस्पर्ध्यांकडून चांगलाच प्रतिकार होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.









