रियाधमधील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा अव्वल मोटरसायकल रेसर सीएस संतोषचा सौदी अरेबियात सुरू असलेल्या डकार रॅलीत भीषण अपघात झाला असून डॉक्टरांनी त्याला बेशुद्धावस्थेत ठेवले आहे. तेथून त्याला खास विमानाने उपचारासाठी रियाधमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
डकार रॅली ही जगातील सर्वात मोठय़ा रॅलीजपैकी एक असून त्यात 37 वर्षीय संतोष हिरो मोटोस्पोर्ट्सचे प्रतिनिधित्व करीत आहे. बुधवारी त्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये 24 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. ‘डकार 2021 च्या चौथ्या टप्प्यातील रॅलीवेळी दुर्दैवाने संतोषच्या गाडीला अपघात झाला असून त्याला रियाधमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे दिसून आले आहे. यातून तो लवकर बरा व्हावा, यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करून त्याला शुभेच्छा देऊयात,’ असे हिरो मोटोस्पोर्ट्सने ट्विटच्या माध्यमातून सांगितले.
मिळालेल्या वृत्तानुसार, त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर मेडिकल स्टाफ त्याच्याजवळ गेले तेव्हा तो पूर्ण सावध आणि शुद्धीत होता. नंतर ताबडतोब त्याला तेथून रियाधला हलविण्यात आले. गेल्या वर्षीही याच टप्प्यात झालेल्या अपघातात हिरो मोटोस्पोर्ट्सचा ड्रायव्हर पावलो गोन्साल्विसचे निधन झाले होते. डकार 2020 रॅलीमध्ये हा अपघात झाला होता. गोन्साल्विसचा मृत्यू झाल्यानंतर हिरो मोटोस्पोर्ट्सने या रॅलीतून माघार घेतली होती.
या टप्प्यातील सुमारे 135 किलोमीटर्स अंतरावर असणाऱया रेताळ ट्रकवर संतोषचा अपघात झाल्यानंतर त्याला हा टप्पा सोडून द्यावा लागला. डकार रॅली ही रस्त्याबाहेर होणारी जगातील सर्वात अवघड रॅली मानली जाते आणि संतोषने त्यात सातव्यांदा भाग घेतला होता. 2015 मध्ये ही शर्यत पूर्ण करणारा पहिला
भारतीय चालक होण्याचा मान त्याने मिळविला होता. त्यानंतरही त्याने हा पराक्रम दोनदा केला होता. यापूर्वी 2013 अबु धाबी चॅलेंजमध्येही त्याला जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी त्याच्या सुझुकी एमएक्स 450 एक्स गाडीने पेट घेतल्यानंतर त्याची मान होरपळली होती.
2 ते 16 जानेवारीपर्यंत होणाऱया या रॅलीची 12 टप्प्यात विभागणी करण्यात आली असून एकूण 7646 किमी अंतराची ही रॅली आहे. विशेष म्हणजे यातील चौथा टप्पा सर्वात लांब असून एकूण 813 किमी अंतर या टप्प्यात असणार आहे.









