वृत्तसंस्था/ जेद्दाह, सौदी अरेबिया
फ्रान्सच्या स्टीफन पीटरहॅन्सेलने येथे झालेल्या डकार रॅलीचे 14 व्या वेळी जेतेपद पटकावले. मोटारस्पोर्ट्स कॅलेंडरमधील अत्यंत खडतर मानल्या जाणाऱया या रॅलीचे 30 वर्षापूर्वी त्याने पहिल्यांदा जेतेपद मिळविले होते.
पीटरहॅन्सेलला त्याच्या यशस्वी कामगिरीमुळे ‘मि.डकार’ अशा टोपण नावाने संबोधले जाते. त्याने कार विभागात आठ तर मोटारबाईक विभागात सहा अजिंक्यपदे मिळविली आहेत. या 55 वर्षीय मिनी ड्रायव्हरने एदुआर्द बोलँजर या सहपायलटसमवेत कतारच्या नासेर अल अतियाहला (टोयोटा) मागे टाकत पहिले स्थान पटकावले. आणखी एक मिनी ड्रायव्हर स्पेनच्या कार्लोस सेन्झने तिसरे स्थान मिळविले. या शर्यतीवेळी एक दुखद घटनाही घडली असून फ्रान्सचा मोटरसायकलिस्ट पीयर चेर्पिनचे त्याची बाईक उलटल्यानंतर झालेल्या दुखापतीमुळे निधन झाले. यावर्षीचा या रॅलीतील हा पहिला बळी ठरला. पीटरहॅन्सेलने विजय मिळविण्याच्या काही वेळ आधीच चेर्पिनच्या निधनाचे वृत्त मिळाले होते.
मोटरबाईक विभागात अर्जेन्टिनाच्या केव्हिन बेनाव्हाईड्सने विद्यमान विजेत्या अमेरिकेच्या रिकी ब्रॅबेकला मागे टाकत जेतेपद पटकावले. दोघेही होंडा बाईक चालवत होते. 1987 नंतर हेंडाचालकांनी पहिले दोन क्रमांक पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. ब्रिटनच्या सॅम सुंदरलँडने या प्रकारात तिसरे स्थान मिळविले.









