जिल्हाधिकारी-आंदोलनकर्त्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा : शेतकरी नेत्यांची 15 रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
प्रतिनिधी/बेळगाव
ऊस दरासाठी शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले होते. जोपर्यंत सरकारकडून ठोस निर्णय येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतकऱयांनी घेतला होता. मात्र, मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी आंदोलनकर्त्यांबरोबर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी 15 ऑक्टोबर रोजी बैठक घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी काही शेतकरी नेत्यांनी बेंगळूरला जावे, अशी विनंती केली. त्यामुळे शेतकऱयांनी छेडलेले आंदोलन मंगळवारी रात्री उशिरा आंदोलन मागे घेतले आहे.
सोमवारी शेतकऱयांनी ऊस दरासाठी किल्ला तलावापासून मोर्चा काढला.
त्यानंतर कित्तूर चन्नम्मा चौक येथे तब्बल दोन तास आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडले. यावेळी पोलीस आणि शेतकऱयांमध्ये जोरदार वादावादी झाली होती. पोलिसांनी शेतकऱयांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारासमोर अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱयांनी संरक्षक भिंतीवरून उडी टाकून आत प्रवेश केला. त्यानंतर प्रवेशद्वारासमोरच शेतकऱयांनी ठाण मांडले होते.
भरपावसात शेतकऱयांनी हे आंदोलन केले. कित्तूर चन्नम्मा चौकात पावसातच अर्धनग्न होऊन शेतकऱयांनी आपला हिसका दाखवून दिला. त्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन अहोरात्र सुरू ठेवू, असा इशारा दिला होता. त्याच ठिकाणी स्वयंपाक करून शेतकऱयांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. मात्र, आता जिल्हाधिकाऱयांनी आश्वासन दिल्यामुळे शेतकऱयांनी आंदोलन मागे घेतले आहे.
मुख्यमंत्री आणि साखरमंत्र्यांनी हा तिढा सोडवावा, अशी मागणी शेतकऱयांनी केली होती. 3 हजार 500 रुपये दर दिला पाहिजे. वास्तविक साखर आणि इतर उत्पादने पाहता 5 हजार 500 दर मिळणे गरजेचे आहे. तरीदेखील आम्ही यावषी 3 हजार 500 रुपये प्रतिटन दर स्वीकारु. पण त्यामध्ये एकही रुपये जरी कमी कमी दिला तर आम्ही स्वीकारणार नाही, असे सांगितले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱयांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंदच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांना फेरा मारून दुसऱया बाजूने कार्यालयात शिरावे लागत आहे. या आंदोलनामध्ये रवी सिद्दमण्णावर, राघवेंद्र नाईक, चुन्नाप्पा पुजेरी, शिवानंद मुधोळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
बार असोसिएशनचा पाठिंबा
शेतकऱयांच्या आंदोलनाला बेळगाव बार असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी, ज्ये÷ वकील मोहन माविनकट्टी यांनी भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. शेतकऱयांची मागणी योग्य असून सरकारने तातडीने त्याची पूर्तता करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
बेळगावातही 15 रोजी बैठक
मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्यासाठी काही मोजके शेतकरी नेते बेंगळूरला जाणार आहेत. तर येथील काही शेतकरी नेत्यांना बेळगाव येथे होणाऱया बैठकीलाही निमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीत सर्व साखर कारखानदार व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्या बैठकीमध्येही शेतकऱयांनी आपले म्हणणे मांडावे, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले आहे.









