प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेच्या कायम व रोजंदारी कर्मचाऱयांप्रमाणे ठोक मानधनावर सेवा बजावणाऱया कर्मचाऱ्यांनाही दिवाळी ऍडव्हान्स देण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक ईश्वर परमार यांनी केली आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना त्यांनी बुधवारी निवेदनही दिले.
परमार यांनी निवेदनात म्हटले आहे. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन व कोहापूर महानगरपालिका कर्मचारी संघटना यांच्यातील बैठकीत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 12,500 रूपये तसेच रोजंदारी कर्मचाऱयांना 4000 रूपये प्रमाणे दिवाळी ऍडव्हान्स देणेस मंजुरी देण्यात आली आहे. ही बाब अत्यंत आनंदाची अशी आहे. याबद्दल महापालिका प्रशासनाला मनापासून धन्यवाद आहेत. पण कायम आणि रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांप्रमाणे ठोक मानधनावरही विविध विभागात अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. ते देखील इतर कर्मचाऱयांच्या बरोबरीने काम करत आहेत.
यापैकी बरेच अधिकारी व कर्मचारी 8 ते 10 वर्षापासून सेवेत आहेत. या सर्वांना कायम कर्मचाऱयांच्या तुलनेत कमी पगार देण्यात येतो. इतर कोणतेही भत्ते अथवा सुविधा दिल्या जात नाहीत. सर्व सुविधा व जादा पगार असताना कायम कर्मचारी आर्थिक समस्येला तोंड देत आहेत. ते पहिले असता ठोक मानधनतत्वावरील कर्मचाऱयांच्या स्थितीची कल्पना केलेली बरी. त्यामुळे त्यांनाही किमान तीनहजार ते पाचहजार प्रमाणे दिवाळी ऍडव्हान्स मंजूर ऍडव्हान्स मंजूर करावा, असेही परमार यांनी निवेदनात म्हटले आहे.