वार्ताहर / राजापूर
ठोक अनुदानातील 5 कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी देण्याचा विषय शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात नेला आहे. बुधवार 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता या बाबतची सुनावणी होणार आहे. जिल्हाधिकारी यांच्यासमोर होणाऱ्या या सुनावणीसाठी अर्जदार म्हणून नगर परिषदेतील शिवसेना विरोधी गटनेते विनय गुरव तसेच सामनेवाले म्हणून नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे तसेच मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना हजर राहण्याचे सूचित करण्यात आले आहे.
नगर परिषदेतील विरोधी गट असलेल्या शिवसेनेने सूचवलेल्या कामांना सर्वसाधारण बैठकीत बहुमताच्या ठरावाच्या जोरावर सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-भाजपा गटाने नामंजूर केल्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 308 नुसार संबंधित ठराव रद्द करण्यासाठी किंवा ठरावात नाहरकत प्रमाणपत्रे देण्याबाबत फेरफार होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली होती.
विषयपत्रिकेवरील कामांच्या मंजुरी विषयावर झालेल्या मतदानात भाजपा नगरसेवकाच्या पाठिंब्याने काँग्रेस आघाडीने 9 विरूध्द 8 मतांनी ही कामे नामंजूर केली होती. या ठोक निधीतून शहरातील महत्वपूर्ण रस्ते, पाणीपुरवठा योजना अशा सार्वजनिक कामांची यादी मंजूर करून ती कामे शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे नगराध्यक्ष ऍड.जमीर खलिफे यांनी स्पष्ट केले होते तर सभेनंतर विरोधी गटनेते विनय गुरव यांनी जिल्हाधिकाऱयांकडे धाव घेतली होती.
भाजपाच्या नगरसेवक गोविंद चव्हाण यांनी सत्ताधारी काँग्रेस आघाडीच्या बाजूने मतदान केल्याने 9 विरूध्द 8 अशा मतांनी शिवसेनेच्या गटाने मंजूर करवून आणलेली कामे नामंजूर झाली होती. त्यामुळे आता जिल्हाधिकारी या प्रकरणी काय निर्णय देतात, याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
Previous Articleठाकरे सरकारने शेतकऱयांच्या तोंडाला पुसली पाने
Next Article अनोळखी माणसाला भाकरी द्यावी, पण ओसरी देऊ नये









