सध्याचे दर सर्वात कमी- ठेवीदांराना दिलासा मिळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बँकेत गुंतवणूक करणाऱयांसाठी एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे ठेवींवरचे व्याजदर वाढवण्याचा विचार रिझर्व्ह बँक करत असल्याचे समजते. याबाबतचे पाऊल लवकरच उचलले जाणार असून बँकेतील ठेवीदारांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे. बँकांत ठेवलेल्या एफडींवर लवकरच जादा व्याजदर आकारण्यास सुरूवात होणार असल्याचे सांगण्यात येते. यासंबंधात रिझर्व्ह बँकेने याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केला आहे.
रिझर्व्ह बँकेने बँकांना सीआरआर 3 ऐवजी 4 टक्के करण्याचे आवाहन केले आहे. रिझर्व्ह बँकेने पुढचे चार महिने सीआरआर कोरोना महामारी पूर्व स्तरावर ठेवण्यासाठी आवाहन केले आहे. या रिझर्व्ह बँकेच्या आवाहनानंतर बँकांकडे अंमलबजावणीनंतर तरलतेचे प्रमाण घटणार आहे. ही भरपाई बँका गुंतवणूकीच्या माध्यमातून भरून काढणार आहेत. त्यामुळे बँकांना एफडी किंवा ठेवींवरचा व्याजदर वाढवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. बँका आकर्षक व्याजदराचा पर्याय ठेवीदारांसमोर ठेऊ शकणार आहेत. म्हणजे गेले काही महिने कमी कमी होत जाणारा व्याजदराचा सिलसिला आता थांबणार आहे. कमी व्याजदराबाबत अनेक ग्राहकांनी बँकांकडे तक्रार नोंदवली होती, असे कळते. त्यामुळे बँकांच्या ठेवींच्या संख्येवरही परिणाम होताना दिसत आहे. फेब्रुवारी 2013 ते जानेवारी 2020 पर्यंत सीआरआर 4 टक्के इतका राहिला आहे. याकाळात बँका 6.50 ते 7.50 टक्के इतका व्याजदर आकारत होत्या. कोरोना महामारीच्या काळात रिझर्व्ह बँकेने रेपो रेट खूप कमी केला होता. अगदी 5 टक्के इतका ठेवींवर व्याजदर आकारला जात होता.
सीआरआरमध्ये वाढ करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बँकांना 4 महिन्यांचा कालावधी दिला आहे. पहिल्या टप्य़ात 27 मार्च 2021 पर्यंत सीआरआर 3.5 टक्के करण्यात येईल. दुसऱया टप्प्यात 22 मे 2021 पर्यंत सीआरआर 4 टक्के केला जाईल. असे झाल्यास मात्र कर्जदरात वाढ होण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. जुन्या कर्जधारकांसह नव्या कर्जधारकांनाही कर्जाच्या व्याजदरवाढीचा फटका येणाऱया काळात बसू शकतो, असे सांगितले जात आहे. कोरोना संकटाच्या काळात ठेवींवरचे व्याजदर कमी करण्यात आल्याने वरिष्ठ नागरिकांचे आणि छोटय़ा गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत होते. कारण सुरक्षित ठेवींसाठी ते बँकांनाच प्राधान्य देत होते. व्याजदर कमी झाल्याने गुंतवणूकीवरील परतावा कमी मिळत होता.









