प्रतिनिधी/ सातारा
कोडोली ग्रामस्थ गेली चार वर्ष तेंड दाबून बुक्यांचा मार सहन करत आहेत. बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे हा त्रास सहन करावा लागत आहे. सातारा ते रहिमतपूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. हे काम अर्धवट अवस्थेत करण्यात आलेले आहे. कोडोली येथील साई सम्राट मंगल कार्यालयाच्या समोरच दोन्ही बाजूने रस्ता केलेला आहे. पुढे एकच रस्ता रहिमतपूरकडे जात आहे. त्यामुळे साताऱयाकडून येणारी वाहने ही सुसाट रहिमतपूरच्या बाजूने जात असल्याने नव्याने अपघात पॉईंट बनला आहे. त्यामुळे कोडोली येथील नागरिक आक्रमक झाले आहेत. लवकरात लवकर पुलाचे आणि रस्त्याचे काम बांधकाम विभागाने मार्गी लावावे अशी मागणी होत आहे.
साताऱयापासून रहिमतपूरपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. अजंठा चौक ते धनगरवाडी ग्रामपंचायतीच्या कमानीपर्यंत रस्ता रुंद करण्यात आलेला आहे. हे कामही अतिशय धिम्या गतीने गेल्या तीन वर्षांपासून सुरु आहे. सध्या हे काम बंद अवस्थेत असल्याने अनेक त्रुटी झालेल्या कामात दिसून येत आहेत. त्यामध्ये सातारा बाजूकडून रहिमतपूर बाजूकडे जाताना वाहने सुसाट जातात. परंतु पुढे गेल्यावर पुलाजवळ रस्ताच संपतो आहे. रस्ताच पुढे नसल्याने आणि कोणताही बोर्ड नसल्याने सरळ पुलामध्ये अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत. त्याची नोंदही कुठेच झाली नाही. रात्रीची वाहने थेट त्या ओढय़ात जातात. त्याकरता तेथे रेडियमयुक्त बोर्डही लावलेला नाही केलेले कामामध्ये गटर आणि साईडपट्टय़ाचा प्रश्न भिजत राहिलेला आहे. कोडोलीची प्राथमिक शाळा तेथेच आहे. त्या शाळेवर येणाऱया जाणाऱया विद्यार्थ्यांना या अपुऱया कामांचा धोका आहे. काम पूर्ण होईपर्यंत किमान बोर्ड लावून सूचना फलक तरी लावावेत, अशी मागणी होवू लागली आहे.
लवकरात लवकर पुलाचे काम करावे
या रस्त्याचे काम होताना कोडोलीकरांना अतिशय मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोडोलीतील राहिलेले रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावले पाहिजे. पुलाचे रुंदीकरण बांधकाम विभागाने तातडीने करणे गरजेचे आहे. आम्ही कित्येकदा विनंती बांधकाम विभागाकडे केली आहे.
रामदास साळुंखे
पंचायत समिती सदस्य
किमान एखादा सूचना फलक तरी लावावा
या रस्त्याचे काम सुरु आहे. परंतु बांधकाम विभागाने सूचना फलक कोठेही लावलेला नाही. तसेच कोडोली शाळेच्या ठिकाणी मुलांना येण्याजाण्याकरता ब्रिज गरजेचा आहे. संध्या रस्ता ओलांडता येत नाही. एवढी वाहनांची गर्दी असते. बांधकाम विभागाने नागरिकांच्या हिताकरता उपाययोजना कराव्यात.
अशोक जाधव







