उचगाव येथे जनजागृतीप्रसंगी युवकांचा निर्धार
वार्ताहर /उचगाव
मराठी भाषिकांना आपल्या मातृभाषेतून कागदपत्रे द्यावीत, या मागणीसाठी 8 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनाची जनजागृती उचगाव येथे करण्यात आली. यावेळी मराठी युवकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे व आपली एकजूट दाखवावी, असे आवाहन माजी ता. पं. अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर यांनी केले.
उचगाव येथील मध्यवर्ती गणेश विठ्ठल-रुक्माई मंदिराच्या प्रांगणात जनजागृती व पत्रकांचे वितरण करण्याचा कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले.
बाळासाहेब देसाई म्हणाले, उचगाव आणि परिसरात आपण सर्वांनी मिळून व्यापक जनजागृती करून मराठी भाषिक अधिक संख्येने आंदोलनात कसे सहभागी होतील, यासाठी प्रयत्न करूया. मराठी भाषिकांच्या मतांवर निवडून येणारे लोकप्रतिनिधी मराठी भाषिकांसाठी व त्यांच्या हक्कांसाठी कधीही पुढे येत नाहीत. निवडून आल्यानंतर मूग गिळून गप्प बसतात. यासाठी आपण हा लढा लढायचा आहे, असे सांगून युवकांनी मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, अशी विनंती त्यांनी केली.
सरकारी परिपत्रके ही कानडीबरोबरच मराठी भाषेत मिळावीत, ही सीमाभागातील मराठी भाषिकांची सततची मागणी आहे. मराठी भाषेतून सरकारी कागदपत्रे मिळाल्यास मराठी भाषिकांची कुचंबणा होणार नाही. कानडीबरोबरच त्यांच्या भाषेतही सरकारी परिपत्रके व कागदपत्रे मिळाली पाहिजेत, उच्च न्यायालयाने कानडीबरोबर मराठी भाषेतील परिपत्रके दिली पाहिजेत, असा आदेश बजावलेला आहे. मात्र इतके होऊनही कर्नाटक सरकारने आडमुठेपणा सोडला नाही. तेव्हा सोमवार दि. 8 ऑगस्ट रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे. त्यामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचा निर्धार मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी केला आहे. पुंडलिक पावशे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









