प्रतिनिधी / मडगाव :
ठाणे-महाराष्ट्र येथून गोव्यात आलेले पती-पत्नी हे कोरोना संक्रमित असल्याने या दोन रूग्णांची भरती काल गुरूवारी मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. आहे. त्यामुळे कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱयांची एकूण संख्या 45 वर पोचली होती. गोव्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 52 असून त्यापैकी 7 जण दीड महिन्यापुर्वीच बरे झालेले आहेत.
बुधवारी कोरोना चार रूग्ण कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. गुरुवारी केवळ दोनच रूग्ण दाखल झाल्याने किंचित दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. राजधानी एक्सप्रेस या दोन विशेष रेलगाडय़ांतून आलेल्या प्रवाशांमुळे व त्यात कोरोना संक्रमित रूग्ण सापडल्याने कोविड हॉस्पिटलमध्येही तणावग्रस्त स्थिती होती. मात्र, गुरुवारी दोनच रूग्ण सापडल्याने येथील कर्मचाऱयांना दिलासा मिळाला आहे.
राज्यात 1.25 लाख कामगारांची नोंदणी : संजय कुमार
दरम्यान, गोव्यात कामगारांची सुमारे 1.25 लाख नोंदणी झाली असून एकूण 36132 जणांना रेल्वेमधून त्यांच्या राज्यात पाठविण्यात आल्याची माहिती सचिव संजय कुमार यांनी नमूद केले. पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या मार्गदर्शन तत्वानुसार गोव्यात येणाऱया प्रत्येक प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात येते आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह सापडलेले सर्व रुग्ण मडगावच्या कोविड हॉस्पिटलात दाखल झाले आहेत.
… तर त्या विद्यार्थ्यांस परीक्षेची संधी देणार : मोहनन
दहावीची परीक्षा देणाऱया एखाद्या विद्यार्थ्यांचे तापमान थर्मलगनने जास्त आढळले तर त्याला वेगळा ठेऊन त्याच्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करून त्यास परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी दिली.
गोव्यात आलेले बहुतेक सर्व खलाशी हे कोरोना चाचणीत निगेटिव्ह असल्याचा दावा मोहनन यांनी केला आहे.
कामगारांचा खर्च राज्यांकडून
गोव्यातून इतर राज्यात जाणाऱया कामगार, मजुरांचा खर्च संबंधित राज्ये करतात. ती राज्ये ठराविक रक्कम रेल्वेकडे भरून विशेष श्रमिक रेल्वेचे आरक्षण करतात आणि गोव्यात नोंदणी झालेल्या कामगारांची माहिती त्या त्या राज्यातील सरकारला पाठवल्यानंतर रेल्वेची सोय निश्चित करण्याची जबाबदारी त्या त्या राज्यांची आहे. रेल्वे ठरल्यानंतर नोंदणीकृत कामगार मजुरांना एसएमएस पाठवून रेल्वेच्या वेळेची, दिवसाची माहिती देण्यात येते आणि नंतरच त्यांना रेल्वेतून पाठवले जाते, असा खुलासा संजयकुमार यांनी केला. त्यासाठी गोव्यात पैसे घेतले जात नाहीत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.









