ऑनलाईन टीम / ठाणे :
ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्यात याआधीच 2 ते 12 जुलैपर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आला होता. पण आता यामध्ये अजून वाढ करण्यात आली असून हा लॉक डाऊन 19 जुलै पर्यंत वाढवला आहे. कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लॉक डाऊन सुरू असताना देखील रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. सध्या मुंबईपेक्षा ठाण्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आता 19 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत लॉक डाऊन असेल, असे पालिका आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
या लॉक डाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे मात्र अन्य कोणीही घराबाहेर पडू शकणार नाही. लॉक डाऊनचे हे आधीचे नियम कायम ठेवण्यात आले असून त्यात केवळ एक बदल करत घरकाम करणाऱ्या व्यक्तींना कामावर जाण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच अटी व नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.









