ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबईचे पालकमंत्रीदेखील असणारे अस्लम शेख यांनी स्वतः ट्विट करत आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. माझ्यामध्ये सध्या कोरोनाची कोणती लक्षणं नसून, स्वत:चं विलगीकरण केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी कोरोनाची चाचणी करण्याची विनंती करतो. मी घरातून काम करत राज्यातील लोकांची सेवा करण्याचं काम सुरु ठेवणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, याआधी ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आणि अशोक चव्हाण यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. या तिन्ही मंत्र्यांनी यावर मात केली असून त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.









