सरकार आज-उद्या पडेल या विरोधकांच्या घोषणा खोटय़ा ठरवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वादळी सरकार दोन वर्षे पूर्ण करत आहे. विशेष म्हणजे पवार, फडणवीस यांचा दिल्ली दौरा होताना मार्च महिन्याची भविष्यवाणीही राणेंकडून याच मुहूर्तावर झाली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या भिन्न विचारधारांनी एकत्र येत चालवलेल्या महाविकासआघाडी सरकारला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यापूर्वी अशा परस्पर विरोधी विचारांचे सरकार चालवण्याचा पहिला प्रयत्न 1978 मध्ये ज्ये÷ नेते शरद पवार यांनी यशस्वी केला. मात्र पावणेदोन वर्षांनी ते सरकार इंदिरा गांधी यांनी बरखास्त केले होते. मात्र आज कितीही मनात आले तरी भाजपला ठाकरे सरकार बरखास्त करणे शक्मय नाही. पण सरकार पडणार, एक पक्ष फुटणार अशा वावडय़ा उठतात. जूनमध्ये राष्ट्रवादीच्या स्थापना दिनी वावडी उठताच पवारांनी कापली. आता हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदीय समितीच्या आणि कृषी कायदे मागे घेण्यासाठी मंत्र्यांशी बैठकीसाठी ते दिल्लीत असताना पक्ष बैठकीसाठी आलेल्या फडणवीस-पाटील जोडीच्या दौऱयाशी जोडून पुडय़ा सोडल्या गेल्या आहेत. याच दरम्यान राणेंनी सरकार मार्चमध्ये पडेल असे बोलून शुक्रवारी तापवलेल्या तव्यात पाणी ओतले. अशा स्थितीत राज्यातील वातावरण कायम धगधगते राहणे अपेक्षितच. सरकारवर होणारे आरोप आणि विरोधकांचा गदारोळ, न्यायालयीन लढाईनंतर सीबीआय, इडी, एनआयए, नार्कोटिक्स विभागांच्या चौकशा, दोन मंत्र्यांना द्यावे लागलेले राजीनामे यामुळे राज्यात गेली दोन वर्षे वातावरण वादळी आहे. विरोधी भाजपकडून आरोपांमागून आरोप सुरू आहेत. तर केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सत्ताधारी वारंवार करत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने दोन वर्षे पूर्ण करणे तसे वेगळेच. सुशांत सिंग प्रकरणात खुद्द आदित्य ठाकरे यांना गोवण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचा आरोप करणाऱया परमबिर सिंह यांनी आपले आरोप ऐकीव माहितीवर असल्याचे चौकशी आयोगासमोर वकिलांमार्फत सांगितले, छगन भुजबळ यांची ईडी चौकशी न्यायालयाने पुरेशी न मानत त्यांची निर्दोष मुक्तता केली. या सरकारसाठी जमेच्या बाजू ठरल्या. तर मंत्री संजय राठोड, अनिल देशमुख यांचे राजीनामे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अनिल परब, हसन मुश्रीफ, खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर छापे, चौकशा यांनी वातावरण ढवळून निघाले. मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला अटक आणि त्यानंतर मलिकांनी आक्रमकता दाखवत नारकोटिक्स विभागाचे समीर वानखेडे आणि भाजप यांच्यावर केलेले गंभीर आरोप यामुळे विरोधक बॅकफूटवर गेले.
जिल्हा बँकांचा दिशादर्शक निकाल
राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांचा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल सत्ताधाऱयांच्या बाजूने लागल्याने त्यांचे मनोबल उंचावले आहे. त्यातच नव्याने सहा जागा बिनविरोध होत शिवसेना, काँग्रेस, भाजपचे प्रत्येकी दोन बिनविरोध तर नागपुरात भाजपचे बावनकुळे विरूद्ध भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेले भोयर यांच्यात सामना रंगेल. त्यातच राज्यातील काही महत्त्वाच्या जिल्हा बँकांचे लागलेले निकाल भाजपसाठी चिंतनाचे ठरणार आहेत. कोकणात रत्नागिरी जिल्हा बँकेत नारायण राणेंचे केवळ दोन सदस्य तर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादीचे चोरगे यांनी 18 जागा मिळवल्या. लातूर काँग्रेसने एकहाती जिंकले. जळगावमध्ये एकनाथ खडसे यांनी भाजप बरोबरच गिरीश महाजन यांचे उट्टे काढत सर्व जागा जिंकल्या. जळगावात शक्ती माझीच होती. मात्र मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असल्याने माझ्या मागे चौकशा लावून फडणवीसांनी महाजनांना विनाकारण मोठे केले, असे बोल लावण्याची संधी खडसेंना लाभली. आता विधान परिषद आणि मंत्रिपदासाठी खडसे पवार यांच्याकडे अधिक ताकदीने प्रयत्न करतील. खडसे सक्रीय होण्याचा परिणाम भाजपला अनेक जिह्यात त्रासदायक ठरू शकतो. धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेत भाजपात आलेल्या आणि आजच पुन्हा आमदार बनलेल्या अमरीश पटेल यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या भावाचा पराभव केला. येथे शिवसेनाही सर्वपक्षीय पॅनेल बाहेर होती. राजवर्धन कदमबांडे आणि अमरीश पटेल जसे सांगतील तसे इथे राजकारण फिरेल. राष्ट्रवादी उत्तर महाराष्ट्रात संधी साधत असताना पश्चिम महाराष्ट्रात मात्र त्यांच्या हक्काच्या सातारा जिह्यात मोठीच गडबड झाली. शरद पवारांचे निकटवर्तीय असणाऱया माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा त्यांच्या पॅनलच्याच नेत्यांनी अवघ्या एका मताने पराभव केला. चार राजे आणि अडचणीत असणारे प्रभाकर घारगे विजयी होतात आणि शशिकांत शिंदे व शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई थोडक्मयात पराभूत होतात याने महा आघाडीला हादरा बसला आहे.
शरद पवारांनी त्यासाठीच महाबळेश्वर दौरा रद्द करून साताऱयात बैठक घेतली आणि शिंदे यांनी गाफील राहायला नको होते असे वक्तव्य केले. त्याचा परिणाम भविष्यात आ. शिवेंद्रराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राजकारणावर होण्याची चिन्हे आहेत. दुसऱया बाजूला राष्ट्रवादीचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काँग्रेसचे उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या विरोधात विजयासाठी भाजपचे अतुल भोसले यांच्याशी हातमिळवणी करून त्यांची वीस मते मिळवली. आठ मतांनी ते विजयी झाले. भाजपच्या आा.गोरे, खा. निंबाळकर यांच्या उमेदवारांची माघार आणि सत्तापक्षातील प्रमुख नेत्यांचा पराभव हा योगायोग नाही. अशीच परिस्थिती सांगली जिह्यात झाली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पॅनल असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत यांचा पराभव करुन भाजप उमेदवार विजयी झाल्याने तसेच भाजपचे इतर तीन विजयी झाल्याने कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचा गट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर नाराज झाला आहे. या दोन्ही जिह्यातील घटनांचे पडसाद भविष्यात पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावरही दिसून येतील.
शिवराज काटकर