ईडी, सीबीआयला असलेले थेट अटकेचे अधिकार आणि राज्य सरकारच्या अटकेच्या कारवाईला मर्यादा पडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भाषणाने अधिवेशनाचा समारोप केला.
ईडी, सीबीआयच्या गुन्ह्य़ात दोन मंत्र्यांना जामीन नाही. त्यात राज्य सरकारने गुन्हे दाखल केलेले परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना मात्र न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. त्याचे पडसाद खा. संजय राऊत व अन्य नेत्यांच्या वक्तव्यातूनही उमटले. त्यावर सर्वोच्च न्यायालय नाराज झाले. शिवाय परमबीर सिंग प्रकरणही सीबीआयकडे सोपवले. ज्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना रश्मी शुक्ला यांच्या विरोधात स्वतःलाच न्यायालयात खटला दाखल करावा लागला. भाजपकडून दररोज होणारे आरोप आणि ईडी, सीबीआय कारवायांच्या भाजप नेते करत असलेल्या घोषणेबरहुकूम होणारी कारवाई यामुळे सत्ताधारी चिडलेत. तशा तीव्र भावना मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर त्यांची मालमत्ता जप्त केल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त झाल्या.
मुख्यमंत्र्यांनी भाजपनेते पातळी सोडत असले तरी न डगमगता सरकार चालवण्याचे आवाहन केले. भाजपच्या घोटाळेबाज माजी मंत्र्यांना जेलमध्ये घातल्याशिवाय केंद्रीय कारवाया थांबणार नाहीत असे त्यांनी सुचवले. ज्या-त्या खात्याच्या मंत्र्यांकडे फडणवीस सरकारमधील भ्रष्टाचाराची माहिती आहे, त्यांनी पुढची कारवाई सुरू करावी असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची चर्चा आहे.
अर्थात थेट अटकेऐवजी जामीन मिळू शकत असल्याने राज्याच्या कारवायांना मर्यादा पडत असल्याने अस्वस्थता आहे. आता राणे, दरेकर, लाड यांच्या बरोबरच चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरही सरकार लक्ष केंद्रित करत आहे. दरेकरांचा जामीन कोर्टाने नाकारल्याने तेही अस्वस्थ आहेत तर जयंत पाटील आपल्याला विनयभंग प्रकरणात गुंतवतील अशी भीती आ. पडळकर यांनी व्यक्त केली आहे. फडणवीस, मुनगंटीवार, बावनकुळे, महाजन यांची चौकशी सरकारने पूर्वीच लावली आहे. मात्र मेहता, मुंडे, निलंगेकर असे माजी मंत्री मात्र कोठेच चर्चेत नाहीत हे विशेष!
ठाकरे यांचे आक्रमक आव्हान
आपल्या वक्तृत्वशैलीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप कारवायांना आव्हान दिले आहे. मी तुरुंगात बसायला तयार आहे पण राजकारणासाठी माझ्या घरावर आरोप करू नका, सत्तेसाठी प्रतिमा मलीन करणे आणि बदनामी करणे हे कुठल्या थराला जाऊन करणार आहात? महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणून बदनामी करायला नको होती, दाऊदचे हस्तक म्हणून आरोप करता पण पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून तुम्हीच बसला असता, आधी रामाचे आता दाऊदच्या नावाने मत मागणार का? अशी टीका ठाकरे यांनी केली आहे. या भाषणाचा प्रभाव किती होईल याची उत्सुकता असणार आहे.
मुंबई, सोन्याचे अंडे, आरोप
विविध कारणांनी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे जाईल तसे शिवसेनेने एकेक विषय हातावेगळे करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील चाळींच्या विकासाचा निर्णय सेनेसाठी फायद्याचा ठरू शकतो, शिवाय अर्थसंकल्पातून विविध कामांसाठी मोठा निधी सेनेने मुंबईच्या पदरात टाकला आहे. कोकणसाठी आणि खान्देशासाठी स्वतंत्र महामंडळ, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील विस्तारित पाणी योजनांना मान्यता आणि निधीची तरतूद, ओबीसी, मराठा, आदिवासी घटकांना निधी देताना तिन्ही पक्षांचा मतदार वर्ग डोळय़ासमोर ठेवलेला दिसतो आहे. मिठी नदीवरील रहिवाशांना अधिवेशन सुरु असतानाच वेळ काढून मुख्यमंत्र्यांनी नव्या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द केल्या. सभागृहात अवघ्या आठ मिनिटांच्या भाषणात हे काम करताना शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून आपल्याला आनंद होत आहे, त्यांनी पाहिलेले प्रत्येकाला घराचे स्वप्न काहीनी मलईसाठी रखडवले, पण, आपण केवळ आश्वासने दिली नाही तर ती पाळली सुद्धा, असे सांगताना मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी वाटते, अंडे खातात, मात्र कोंबडीची निगा राखत नाहीत, असा भाजपवर थेटपणे आरोप केला होता. तर शुक्रवारी देशाची सत्ता मिळूनही मुंबईत जीव अडकल्याची थेट मोदींवर टीका केली. दुसरीकडे फडणवीसांनी, मुंबईत केवळ रंगरंगोटी झाली. महापालिकेत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार केला. आर्थिक व्यवस्थापनाच्या बाबतीत मोठी घसरण झाली. घोटाळय़ांच्या आरोपांचा त्यांनी सभागृहात पुनरुच्चार केला. दोन नेत्यांमधील ही झुंज मुंबई महापालिकेला डोळय़ासमोर ठेवून आहे आणि ती त्याच्या निकालानंतरच थांबेल. तोपर्यंत आरोपांवर आरोप होत राहणार आणि ठाकरे, पवार आपल्या समर्थकांमध्ये उत्साह निर्माण करत राहणार. त्यासाठी शिवसेना 19 खासदारांसह विदर्भाचा दौरा करत आहेत. मुख्यमंत्री व आदित्य ठाकरे यांचाही राज्यातील विविध भागात दौरा होईल असे दिसत आहे. भाजपकडून नितीन गडकरिंचाही दौरा सुरु झाला आहे.
अजित पवारांची टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अधिवेशनात फडणवीस यांच्याशी सर्वाधिक सामना केला. विंदांच्या त्यांनी सादर केलेल्या कवितेला दादांनी उंटावरचा शहाणा या विंदांच्याच कवितेने उत्तर दिले. शिवाय प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सदाभाऊ खोत, विनायक मेटे या भाजपच्या आमदारांना निरोप देताना हसत हसत पुढे सेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि भाजपचे चार आमदार येतील. पाचवा शक्ती लावणाऱयांचा येईल असे सांगताना भाजपमधील जुने पुन्हा डावलले जातील, दरेकरांची गती आणि प्रसाद यांचे लाड यावर चर्चा उठवून भाजप तंबूत खळबळ उडवण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी रावसाहेब दानवे यांनी आपल्या संपर्कात सत्ताधारी आमदार असल्याचे म्हटले होते.
शिवराज काटकर








