गोवा येथील ट्रॉलरवरील साहित्य, मासळी लूटप्रकरण : गोवा पोलिसांकडून सर्व संशयितांना अटक, जामीन
गुन्हय़ात वापरलेला ट्रॉलर केला जप्त : मासळीच्या लिलावातून 2 .33 लाख रु. रक्कम
प्रतिनिधी / मालवण:
गोवा येथील पर्ससीन ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी मालवण तालुक्यातील सर्जेकोट आणि कोळंब येथील 16 स्थानिक मच्छीमारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पर्ससीन मासळी लुटीसाठी वापरण्यात आलेला ट्रॉलरही जप्त करण्यात आला आहे. सर्व संशयित 16 मच्छीमारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सर्व संशयितांना अटक करून वैयक्तिक दहा हजारांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. गोवा पोलिसांच्या एका पथकाने मालवण पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली आहे.
गोवा कोलवा येथील जीओ मार्टिंन फर्नांडिस यांच्या मालकीचा पर्ससीन ट्रॉलर गोवा ते मालवण अशा सुमारे 60 ते 65 नॉटीकल मैल समुद्रात मासेमारी करीत असताना ‘ओंकार’ (आयएनडी-एमएच 05 एमएम 3348) या ट्रॉलरवरून नारायण आडकर आणि इतर मच्छीमार यांनी पर्ससीन बोटीवर येत मारण्याची धमकी देत सुमारे नऊ लाख रुपये किमतीची मासळी आणि वायरलेस सेटची चोरी केली, अशी तक्रार कोलवा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. यावरून गोवा पोलिसांनी मालवणातील 16 जणांवर गुन्हे दाखल केले होते.
गुन्हा दाखल असलेले संशयित आरोपी
नारायण उर्फ भगवान सहदेव आडकर (59, रा. सर्जेकोट मिर्याबांद), निहाल राजाराम आडकर (22, सर्जेकोट मिर्याबांद), पुंडलिक कमलाकर शेलटकर (37, रा. कोळंब खालचीवाडी), मयुर हरी खवणेकर (23, सर्जेकोट मिर्याबांद पिरावाडी), किशोर सुभाष कांदळगावकर (42, रा. कोळंब खालचीवाडी), तेजस शंकर फोंडबा (23, सर्जेकोट मिर्याबांद), रजनीकांत संभाजी आडकर (23, सर्जेकोट मिर्याबांद), केदार प्रकाश कुडाळकर (25, सर्जेकोट मिर्याबांद), हर्षल रवींद्र पराडकर (30, सर्जेकोट मिर्याबांद), राहुल दिलीप आडकर (19, सर्जेकोट पिरावाडी), गोविंद मारुती सावजी (22, रा. सर्जेकोट मिर्याबांद), जगन्नाथ अंकुश सावजी (31, रा. सर्जेकोट मिर्याबांद), रजनीकांत रामकृष्ण देऊलकर (31, रा. सर्जेकोट मारुती मंदिरजवळ), नीलेश रमेश आडकर (28, सर्जेकोट मिर्याबांद पिरावाडी), हनुमंत भालचंद्र कवटकर (30, रा. सर्जेकोट जेटीजवळ), जगदीश खांडोबा कांदळगावकर (34, सर्जेकोट मिर्याबांद) या 16 जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
गोवा पोलीस मालवणात दाखल
गोवा येथील ट्रॉलर लूटप्रकरणी संशयित व्यक्ती आणि ट्रॉलर मालवण बंदरात आल्याची माहिती शुक्रवारी पोलीस व सागरी पोलीस दलाच्या अधिकाऱयांना मिळाली. पोलिसांकडून तातडीने ट्रॉलरवर झाडाझडती घेण्यात आली असता त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात मासळी सापडून आली. मालवणचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे, पेडणेकर, महाडिक, मंगेश माने यांनी संबंधितांकडे मासळीबाबत चौकशी करीत ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गोव्याच्या ट्रॉलरची मासळी असल्याची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी गोवा पोलिसांना याची माहिती दिली. मालवण पोलिसांसोबत पोलीस पाटील वासुदेव गावकर आणि पांडुरंग चव्हाण हेही रात्रभर कारवाईत सहभागी झाले होते. गोवा पोलिसांचे एक पथक तात्काळ मालवणात दाखल झाले. यात पोलीस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर, उपनिरीक्षक ऑल्वीटो रॉड्रिक्स, पोलीस कर्मचारी जयेश तारी, केदार भोवर यांचा समावेश होता. गोवा पोलीस मालवणात दाखल झाल्यानंतर त्यांनी संबंधित ट्रॉलरवर जाऊन माशांची पाहणी केली आणि सर्व संशयित व्यक्तींची चौकशी सुरू केली.
दरम्यान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी हे मच्छीमारांसोबत होते. पोलीस यंत्रणेशी चर्चा करून मच्छीमारांची बाजू समजून देण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.
इंजीनच्या केबीनमध्ये होते लपून
मालवण पोलिसांनी पकडलेल्या ट्रॉलरवर काहीजण सापडून आले होते. मात्र तरीही तब्बल 11 जण हे ट्रॉलरचे इंजीन असलेल्या ठिकाणी लपून बसले होते. पोलीस तपासात हे मच्छीमार काही तासानंतर समोर आले होते. सर्वांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. काही राजकीय मंडळींनी आणि मच्छीमार नेत्यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र सदरचे प्रकरण गोवा पोलीस पाहत असल्याचे समजल्यानंतर काहींनी काढता पाय घेतला.
भाजप मच्छीमारांच्या पाठिशी – नीलेश राणे
पारंपरिक मच्छीमारांना न्याय देण्यास राज्य शासन अपयशी ठरले असल्याने मच्छीमारांनी गोव्याचा ट्रॉलर पकडला होता. मच्छीमारांनी आपल्या वेदना शासनाला समजण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे एलईडी पर्ससीन मासेमारी होत असल्याचे दाखवून देण्यासाठी हे पाऊल उचलले होते. यामुळे भाजप पारंपरिक मच्छीमारांच्या पाठिशी सदैव राहणार आहे. यासाठी महाराष्ट्राचे मत्स्य मंत्री अस्लम शेख यांच्याशीही चर्चा करण्यात आली आहे. जर मालवणातील मच्छीमारांवर गोवा येथे गुन्हे दाखल होत असतील, तर गोव्यातील बेकायदेशीरपणे एलईडी पर्ससीन महाराष्ट्राच्या हद्दीत मासेमारी करीत असतील तर त्यांच्यावरही महाराष्ट्रात गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी आपण मत्स्य मंत्र्यांकडे केली आहे, अशी माहिती माजी खासदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दीपक पाटकर, अशोक सावंत, बाबा परब, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर, राजू बिडय़े, मिर्याबांद सरपंच निलिमा परुळेकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
एलईडी बोटी का जप्त होत नाहीत?
एलईडी बोटी जप्त करून त्या अडकून ठेवण्याचा कायदा अस्तित्वात असताना त्याची अंमलबजावणी मालवणात का होत नाही? शिवसेनेकडून मच्छीमारांना फक्त आश्वासने दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही होताना दिसत नाही. आजच्या मालवणच्या प्रकरणात आम्ही मच्छीमारांच्या बाजूने पोलिसांशी चर्चा केली आहे. तसेच आवश्यकता भासल्यास गोवा शासनाशीही चर्चा करण्यात येईल, असेही राणे यावेळी म्हणाले.
2 लाख 33 हजारांना मासळीचा लिलाव
मच्छीमारांनी लुटलेल्या मासळीचा लीलाव शनिवारी मालवण बंदरात करण्यात आला. सदरच्या लिलावात सहभागी झालेल्या मच्छीमार एजंटांनी रोखीने सदरची मासळी खरेदी केली आहे. सदरची मासळी तब्बल 2 लाख 33 हजार 69 रुपयांना खरेदी केली गेली. यात 1010 किलोचा बांगडा, 210 किलो माखुल, मोठी सुरमई 36 किलो, लहान सुरमई 40 किलो आणि इतर मासळी होती. मत्स्य व्यवसाय विभागाने यामध्ये फक्त मासळीचा लिलाव करून दिलेला आहे. इतर सर्व कारवाई ही गोवा पोलिसांनी केली आहे, असे मत्स्य व्यवसाय विभागाने स्पष्ट केले.









