मनीष मल्होत्राकडून चित्रपटाची निर्मिती

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिझाइनर मनीष मल्होत्राने आता चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. मागील महिन्यात त्याने स्वत:चे प्रॉडक्शन हाउस ‘स्टेज 5’ची घोषणा केली होती. त्याच्या प्रॉडक्शनच्या पहिल्या चित्रपटाचे चित्रिकरण आता पूर्ण झाले आहे. मनीष मल्होत्राच्या ‘स्टेज 5’च्या बॅनर अंतर्गत ‘ट्रेन फ्रॉम छपरौला’ची निर्मिती करण्यात येत आहे.
या चित्रपटात राधिका आपटे मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाल्याची माहिती मनीषने दिली आहे. तसेच त्याने एक व्हिडिओ शेअर केला असुन यात पूर्ण टीम जल्लोष करताना दिसून येत आहे. चित्रपट निर्मितीचा हा क्षण भावुक करणारा आणि आनंददायी आहे. आम्ही सप्टेंबरमध्ये चित्रिकरण सुरू केले होते आणि यानंतर न थांबता पूर्ण टीम कार्यरत होती. प्रतिभावंत कलाकारांनी अत्यंत झोकून देत या चित्रपटात काम केल्याचे मनीषने म्हटले आहे.
ट्रेन फ्रॉम छपरौलासोबत मनीष मल्होत्राकडून तीन चित्रपट तयार करण्यात येणार आहेत. यातील एका चित्रपटाद्वारे अभिनेत्री झीनत अमान बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहेत. टिस्का चोप्रा एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. तर फराज अन्सारी हे ‘बन टिक्की’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर विभू पुरी यांच्याकडून एक चित्रपट दिग्दर्शित केला जाणार आहे. विभू पुरी यांनी यापूर्वी ताज या सीरिजचे दिग्दर्शन केले होते.









