प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून सात लाभर्थ्यांना कुबोटा ट्रक्टर मंजूर केल्याच्या एका पत्राने सोशल मिडियावर धुमाकुळ घातला आहे. हे पत्र जिल्हा परिषदेतील एका पदाधिकाऱ्याच्या स्वीय सहायकाने पाहिल्यानंतर त्यांनी ही बाब समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांना सांगितली. पण समाजकल्याण विभागाकडून वैयक्तिक लाभ योजनेतून ट्रॅक्टर दिला जात नसल्यामुळे हे लाभार्थी मंजूरीचे पत्र दिले कोणी ? तसेच लाभ मंजूर केल्याच्या नावाखाली कोणी लाभार्थ्यांची अर्थिक फसवणूक केली आहे काय ? याचा शोध समाजकल्याण विभागाकडून घेतला जात आहे. यामध्ये कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी जि.प. समाजकल्याण विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन घाटे यांनी केले आहे.
सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या पत्रामध्ये तानाजी हिंदळे दऱ्याचे वडगाव, ता. करवीर, शशिकांत कुंभार केर्ले, ता. करवीर, नारायण पोवार बोरिवडे, ता.पन्हाळा, शाम जत्राटकर यळगुड, ता. हातकणंगले, अशोक रेडेकर हेब्बाळ, जलद्याळ, ता. गडहिंग्लज, बाबासो पाटील वडणगे, पाडळी, ता. करवीर, बाळू बोलके तावरेवाडी, ता. गडहिंग्लज या सात लाभार्थ्यांचे ट्रक्टर मागणीचे प्रस्ताव जि.प.समाजकल्याण विभागाकडून मंजूर करून ते पुढील कार्यवाहीसाठी पाठवत असल्याचे नमूद आहेत. तसेच या पत्रावर सामजकल्याण अधिकारी घाटे यांची बोगस सहीदेखील आहे.
त्यामुळे हे पत्र आणि त्यामधील नावे पाहून घाटे यांनी संबंधित गावांतील ग्रामसेवकांना दुरध्वनीद्वारे संपर्क साधून पत्रात नाव असलेल्या नागरीकांची खरोखरच फसवणूक झाली आहे काय ? याबाबत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पत्रात नाव असलेल्या नागरिकांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन घाटे व समाजकल्याण सभापती कोमल मिसाळ यांनी केले आहे. समाजकल्याण विभागाकडून वैयक्तिक लाभापोटी ट्रॅक्टरची कोणतीही योजना नसून याबाबत आणखी कोणी फसवणूक करत असल्याच त्याला बळी पडू नये, तसेच ज्यांनी फसवणूक केली आहे, त्याचे नाव पत्त्यासह समाजकल्याण विभागाकडे पाठवावे असे आवाहनही समाजकल्याण अधिकारी घाटे यांनी स्पष्ट केले आहे.
समाजकल्याण विभागाकडून या योजनांचा दिला जातो लाभ
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून 2021-22 या अर्थिक वर्षात डीबीटी योजनेअंतर्गत कडबाकुट्टी, महिलांना दळप, कांडप यंत्र, शिवणयंत्र, शाळकरी मुला-मुलींना सायकल या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ समाजकल्याण विभागाकडून दिला जातो. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही योजनेचा लाभ समाजकल्याण विभागाकडून दिला जात नसल्याचे समाजकल्याण अधिकारी घाटे यांनी सांगितले.