चिपळूण-कळंबस्ते येथील घटना, मुंबईहून सिंधुदुर्गकडे जात होती ट्रव्हलर्स
चिपळूण
मुंबईहून सिंधुदुर्गकडे प्रवासी घेऊन जाणारी टेम्पो ट्रव्हलर उलटून 11 प्रवासी जखमी झाले. ही घटना शनिवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर शहरालगतच्या वाशिष्ठी नदीच्या पुलावर घडली. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोशन चव्हाण टेम्पो ट्रव्हलरमधून नालासोपारा येथील चाकरमान्यांना घेऊन खारेपाटणला निघाला होता. शनिवारी पहाटे 5.45 च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी उलटली. यामध्ये गाडीतील राजेश संजय शेटय़े, अंकिता राजेश शेटय़े, पूजा भिकू गणपत्ये, विशाल विजय शिगवण, अंकिता अरुण शिर्के, योगेश जनार्दन पवार, काव्या विशाल चव्हाण, विद्या विजय चव्हाण, आर्या विशाल चव्हाण, राहुल गजानन चव्हाण, संदीप गजानन चव्हाण हे प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर खासगी दवाखान्यात उपचार करून सोडण्यात आले.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर उलटलेली ट्रव्हलर क्रेनच्या सहाय्याने महामार्गावरुन बाजूला काढण्यात आली. ट्रव्हलरमधील प्रवासी महेश चंद्रकांत कडू (काळाचौकी-मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अपघातप्रकरणी रोशन रमेश चव्हाण (शिवडी-मुंबई) या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









