बॉब वूडवर्ड हे अमेरिकेतील पत्रकार क्षेत्रात वावरणारे एक अग्रगण्य व्यक्तिमत्त्व. आज ते 77 वर्षांचे आहेत. तरुण वयात अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या सुप्रसिद्ध वृत्तपत्रात काम करताना 1972 साली बॉब वूडवर्ड आणि कार्ल बर्नस्टाईन या दोघांनी तत्कालिन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे ‘वॉटरगेट’ प्रकरण उघडकीस आणून एकच खळबळ माजवून दिली होती. यानंतर या प्रकरणाची सरकारी पातळीवर रीतसर चौकशी होऊन निक्सन यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आजही या वूडवर्ड व बर्नस्टाईन यांच्या कामगिरीचा पत्रकारक्षेत्रात गौरवाने उल्लेख केला जातो. वूडवर्ड अजूनही साहाय्यक संपादक म्हणून वॉशिंग्टन पोस्टशी जोडलेले आहेत. आजपर्यंत त्यांनी अमेरिकन राजकारणावर 19 पुस्तके लिहिली असून त्यातील 13 बेस्ट सेलर्स यादीत समाविष्ट आहेत. याच वूडवर्ड यांचे ‘रेज’ नावाचे पुस्तक पुढील आठवडय़ात विक्रीसाठी येणार आहे. सदर पुस्तकात डोनाल्ड ट्रम्प यांच्या 18 मुलाखतींवर आधारित माहितीचाही समावेश आहे. या पुस्तकाच्या लिखाणा दरम्यान अध्यक्ष ट्रम्प यांनी वूडवर्डना व्हाईट हाऊसमधील वरि÷ अधिकाऱयांना भेटण्याची आणि अध्यक्ष व प्रशासन यांच्या कामकाजाबाबत अंतर्गत माहिती मिळवण्याची मुभा दिली होती.
गेल्या बुधवारी काही प्रसारमाध्यमांनी वूडवर्ड आणि ट्रम्प यांच्या मुलाखतीतील काही भाग प्रसारित केला. त्यातून असे निष्पन्न होते आहे की, फेब्रुवारीच्या पूर्वार्धातच अध्यक्ष ट्रम्प यांना कोरोनाच्या भीषण परिणामांची जाणीव झाली होती. 7 फेब्रुवारी 2020 च्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, की कोरोना विषाणू हा ‘फ्लू’ पेक्षाही धोकादायक असून स्पर्शापेक्षा हवेतून प्रसारित होणे हे त्याचे वैशिष्टय़ इतर साथींपेक्षा खूपच घातक ठरू शकते. फेबुवारीच्या उत्तरार्धात ट्रम्प यांनी म्हटले होते, की या विषाणूला आता नियंत्रित केले आहे आणि लवकरच लागणीची संख्या शून्यावर येईल. त्यानंतर त्यांनी सार्वजनिकरित्या असे जाहीर केले, की ‘फ्लू’ हा कोरोनापेक्षा अधिक धोकादायक आहे. 10 मार्च रोजी कॅपिटल हॉलमधून संबोधन करताना ट्रम्प उद्गारले, की शांत रहावे, कोरोना निघून जाईल. त्यानंतर अवघ्या नऊच दिवसात कोरोना साथ ही राष्ट्रीय आणीबाणी असल्याचे व्हाईट हाऊसमधून जाहीर करण्यात आले. या साऱया परस्पर विरोधी भूमिकांबद्दल वूडवर्ड यांच्याशी बोलताना ट्रम्प म्हणाले, की ‘मला ही समस्या फार मोठी असल्याचे सार्वजनिकरित्या भासवायचे नाही. अमेरिकेत भीतीची लाट निर्माण करायची नाही.’
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या 18 मुलाखतींतून स्पष्ट होणारा हा त्यांचा कोरोनाविषयी दृष्टिकोनाचा भाग प्रत्यक्ष प्रसारमाध्यमातून पुढे आल्यानंतर चर्चेला एकच उधाण आले आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी परवाच या संदर्भात बोलताना, ‘मला भीती पसरवून देशात गोंधळ माजवायचा नव्हता. याउलट आम्हाला आमचा आत्मविश्वास आणि सामर्थ्याचे दर्शन घडवायचे होते. वूडवर्ड यांच्या पुस्तकात जे काही आहे ते राजकीयदृष्टय़ा मोलाचे आहे.’ ट्रम्प यांच्या अशा या बनवाबनवीचा फायदा येत्या नोव्हेंबरमध्ये निवडणुका असताना विरोधकांनी नेमका घेतला आहे. किंबहुना चार, सहा दिवसातच प्रकाशित होणारे वूडवर्ड यांचे पुस्तक निवडणूक प्रचारातील एक हत्यार म्हणून विरोधक वापरतील, असेही बऱयाच जणांना वाटते. निवडणुकीतील ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी डेमॉक्रॅट्स पक्षाचे जो बिडेन यांनी लागलीच या संधीचा फायदा उठवत, ‘कोरोना हा जीवघेणा आजार देशाला उद्ध्वस्त करत असताना वस्तुस्थितीवर पांघरुण घालून ट्रम्प यांनी गलथानपणाचे प्रदर्शन केले आहे. अमेरिकन जनतेची ही जीवघेणी फसवणूक आहे,’ असा आरोप केला. यासंदर्भात टेरा मॅकॅलव्हे या बीबीसीच्या व्हाईट हाऊस संबंधातील वार्ताहराने ‘नेत्यांनी लोकांना शांत ठेवायचे असते, हे जरी खरे असले तरी गोंधळाचे निवारण करणे आणि समस्या अधिकच वाईट होऊ देणे यात जी धूसर रेषा आहे तिची जाणीव ट्रम्प यांनी ठेवलेली नाही. त्यांनी वूडवर्ड यांना कोरोनाचे गांभीर्य सांगितले. मात्र, लोकांसमोर ते न मांडता लोकांना गाफिल ठेवले. याउलट इतर देशातील नेत्यांनी सावधगिरी बाळगली. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी कोरोना हा गंभीर स्वरुपाचा प्राणघातक आजार आहे आणि या साथीत अनेक जणांचे जीव जातील, असे सुरुवातीलाच सांगून टाकले. दोन देशप्रमुखांच्या भूमिकेतील हा फरक बेजबाबदारी आणि जबाबदारपणा स्पष्ट करणारा आहे.’
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर होणारी ही अशी बेजबाबदारपणाबाबतची टीका तशी नवी नसली तरी जवळपास 1 लाख 90 हजार लोक अमेरिकेत आजपर्यंत कोरोनाने मरण पावले आहेत, अशी नोंद होऊनदेखील ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागार मंडळास कोरोनाचे गांभीर्य अजूनही उमगलेले नाही, ही सर्वाधिक आश्चर्याची बाब आहे. एका बाजूला वैज्ञानिक हिवाळय़ात, श्वसन व्यवस्थेच्या समस्या वाढत असल्याने या सुमारास कोरोनात पुन्हा वाढ होण्याचा इशारा देत आहेत तर अलीकडच्या काळातच ट्रम्प यांचे सल्लागार कोरोना हा भूतकाळातील विषय असल्याप्रमाणे ही समस्या संपली असल्याचे मानून बिनधास्त वक्तव्ये करीत आहेत. खरेतर ट्रम्प यांनी या विषयाची संपूर्ण माहिती मिळवून फेब्रुवारी महिन्यातच अमेरिकन नागरिकांना कोरोनाविषयी खबरदारी घेण्यास सांगितले असते, कोरोना प्रतिबंधक प्राथमिक उपाययोजना देशात सुरुवातीसच राबविल्या असत्या तर बळी पडलेल्यांच्या संख्येत बरीच घट झाली असती. एकूण असे दिसते, की डोनाल्ड ट्रम्प यांना लोकांसमोर स्वत:स पोलादी नेता म्हणून सादर करायचे आहे. विषाणूबाबत फारशी काळजी न करता लोकांनी निवडणुकीत सहभाग घ्यावा, जास्तीत जास्त मतदान करून आपणास विजयी करावे, असेही त्यांचे मत आहे. एकप्रकारे आपल्या कथित प्रतिमेच्या आणि राजकीय महत्त्वाकांक्षेच्या अतिरिक्त प्रेमात पडून त्यांनी त्यासाठी लोकांचा बळी जाऊ दिला, हेच विदारक सत्य वूडवर्ड यांच्या पुस्तकातील मुलाखतींवरून आणि ट्रम्प यांच्या लोकांसमोरील भूमिकेतून प्रकट होते.
अनिल आजगावकर








