कनिष्ठ सभागृहात प्रस्ताव संमत : अंतिम निर्णय वरिष्ठ सभागृहात
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात (काँगेस) बहुमताने संमत झाला आहे. त्यामुळे ट्रम्प हे दोनदा डच्चू मिळालेले अमेरिकेचे पहिलेच अध्यक्ष ठरले आहेत. मात्र, त्यांच्यावरील अंतिम महाभियोग आता अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहात (सिनेट) चालणार असून तेथे तो दोन तृतियांश मतांनी संमत झाला, तरच ट्रम्प यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी होऊ शकते, अशी स्थिती आहे.
वास्तविक ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी 19 जानेवारीला, अर्थात आणखी अवघ्या पाच दिवसांनी संपत आहे. त्यांचा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांना दुसरा कालावधी मिळालेला नाही. मात्र, त्यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी अधिकृतरित्या संपण्यापूर्वीच त्यांची हकालपट्टी करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
प्रस्ताव संमत
बुधवारी अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात ट्रम्प यांच्या हकालपट्टीसाठी प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर त्वरित मतदान होऊन तो संमत करण्यात आला. या सभागृहात डेमॉक्रेटिक पक्षाचे बहुमत असल्याने प्रस्ताव सहज संमत होऊ शकला. मात्र ट्रम्प यांची प्रत्यक्ष हकालपट्टी व्हायची असेल तर वरिष्ठ सभागृहात हा प्रस्ताव दोन तृतियांश बहुमताने संमत होण्याची आवश्यकता आहे.
वरिष्ठ सभागृहातील स्थिती
वरिष्ठ सभागृहातही सध्या डेमॉपेटिक आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रत्येकी पन्नास पन्नास सदस्य आहेत. मात्र नियमानुसार बहुमत डेमॉपेटिक पक्षाचे असल्याचे मानण्यात येते. तथापि, विद्यमान अध्यक्षांची हकालपट्टी करायची असेल तर वरिष्ठ सभागृहात महाभियोग दोन तृतीयांश मतांनी संमत होणे आवश्यक आहे. याचाच अर्थ असा की रिपब्लिकन पक्षाच्या किमान 17 सदस्यांनी ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केल्यास महाभियोग प्रस्ताव संमत होऊ शकतो. अमेरिकेत कोणताही पक्ष त्याच्या सदस्यांना पक्षादेश देऊ शकत नसल्याने सदस्य त्यांच्या इच्छेनुसार मतदान करू शकतात. तथापि, रिपब्लिकन पक्षाचे 17 सदस्य ट्रम्प यांच्याविरोधात जाणे अशक्य असल्याचे मतही काही जाणकार व्यक्त करीत आहेत.
बाजू मांडण्याची संधी
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या संसदेत झालेल्या हिंसाचाराला ट्रम्प यांनी चिथावणी दिली, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळेच त्यांच्यावर महाभियोग चालविण्यात येत आहे. मात्र, वरिष्ठ सभागृहात यावर मतदान होण्यापूर्वी रितसर ट्रम्प यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल. त्यानंतरच मतदान घेतले जाईल. अशी या सभागृहातील प्रक्रिया आहे.
ट्रम्प अपात्र ठरतील का
ट्रम्प यांच्यावर केवळ महाभियोगाची टांगती तलवार नाही. ते भविष्यकाळात अमेरिकेचे अध्यक्षपद किंवा कोणतेही अधिकारपद मिळविण्यासाठी अपात्र ठरविले जाऊ शकतात. मात्र, त्यासाठी आधी महाभियोग प्रस्ताव दोन तृतियांश बहुमताने संमत होणे आवश्यक आहे. त्यानंतरच अपात्रतेचा प्रश्न येतो. तथापि काही तज्ञांच्या मते महाभियोग प्रस्ताव अयशस्वी ठरला तरी त्यांच्याविरोधात अपात्रता प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. मात्र यावर तेथील कायदेतज्ञांमध्ये मतभेद आहेत. अशी वेळ आजपर्यंत आलेली नसल्याने त्यासंदर्भात न्यायालयाचा कोणताही निर्णय अस्तित्वात नाही. ट्रम्प यांना अपात्र ठरविल्यास ते न्यायालयात दाद मागू शकतात. एकंदर, सध्या त्यांच्यावर महाभियोग आणि अपात्रता ही दोन्ही आव्हाने आहेत.









