ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेतील संसद भवनात डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांकडून झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊंट कायमस्वरूपी बंद केले. या कारवाईमागे भारतीय वंशाच्या विजया गाडेंनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
विजया या ट्विटरच्या कायदा आणि नीती टीमच्या प्रमुख आहेत. नीती टीम ट्विटरसाठी कायदे निश्चित करते. ट्रम्प यांच्याकडून भविष्यातही हिंसेला चिथावणी देण्याची भीती व्यक्त करत या टीमने ट्रम्प यांचे अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
भारतात जन्मलेल्या विजया लहानपणीचं अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्याचे वडील मेक्सिकोच्या आखातामध्ये असणाऱ्या तेल शुद्धिकरण प्रकल्पामध्ये केमिकल इंजिनियर म्हणून कार्यरत होते. न्यू जर्सीमध्ये विजया यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. कॉर्नेल विद्यापीठ आणि न्यूयॉर्क विद्यापीठामधून कायदा विषयामध्ये पदवीचे शिक्षण घेतले. 2011 साली विजया यांचा ट्विटरसोबतचा प्रवास सुरू झाला.









