प्रतिनिधी/ चिकोडी
ट्रक व ट्रक्टर अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची घटना चिकोडी येथील सय्यद गल्ली कॉर्नरजवळ शनिवारी पहाटे घडली. यामध्ये ट्रक चालक पैजुल्ला जलालसा मुल्ला (रा. रटाळ ता. अथणी) असे गंभीर जखमीचे नाव आहे.
घटनेविषयी रहदारी पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, पैजुल्ला हे आपला ट्रक क्र. (एमएच 09 बीसी 9304) घेऊन बसव चौकातून अंकलीच्या दिशेने जात होता. तर नागाप्पा सिद्धलिंग वडेर (रा. दंडापूर ता. गोकाक) हे आपली ट्रक्टर क्र. (केए 23 टी 0728) ने अंकलीहून गोकाककडे जात होते. चिकोडी येथील सय्यद गल्ली कॉर्नरजवळ येताच ट्रक चालनाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदर ट्रक ट्रक्टरच्या ट्रॉलीस समोरुन येऊन धडकला. यामध्ये ट्रक चालक पैजुल्ला जलालसा मुल्ला यांच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे.
अपघाताची माहिती शहरात समजताच बघ्यांनी गर्दी केली होती. अपघात झालेल्या ठिकाणाचा रस्ता अरुंद असल्याने पहाटे येणाऱया वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी रहदारी पोलीस दाखल होऊन पंचनामा केला. सदर अपघाताची नोंद चिकोडी रहदारी पोलीस ठाण्यात झाली आहे.









