बंदी आदेश असतानाही अवजड वाहतूक : प्रवाशांची प्रखर टीका
प्रतिनिधी /वाळपई
गोवा-कर्नाटक दरम्यानच्या चोर्ला घाट महामार्गावर प्रवाशांना अवजड वाहनांपासून धोका निर्माण होत असल्यामुळे उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांनी अवजड वाहतुकीला बंदी घातली होती. मात्र सरकारची यंत्रणा आदेशाची अंमलबजावणी करण्यास असमर्थ ठरल्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. काल रविवारी बेळगावकडे जाणारा ट्रक रस्त्याच्या बाजूला कलंडल्यामुळे सुमारे 5 तास वाहतुकीचा ‘मेगा ब्लॉक’ झाला. त्यामुळे दोन्ही बाजूने शेकडो वाहने अडकून पडली. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
संतप्त बनलेल्या प्रवाशांनी सरकारच्या यंत्रणेवर तीव्र टीकात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जिल्हाधिकाऱयांचा आदेश हा फक्त कागदोपत्री शिल्लक राहिला आहे काय, असा सवालही उपस्थित केला. अवजड मालवाहतूक करणारा ट्रक गोव्यातून बेळगावच्या दिशेने जात होता. अंजुणे धरण प्रकल्पापासून अवघ्याच अंतरावरील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे तो रस्त्याच्या बाजूला कलंडला.
सकाळी 8.30 वाजता कलंडला ट्रक
ही घटना रविवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे दोन्ही भागांतून होणारी वाहतूक ठप्प झाली. अनेक वाहने अडकून पडण्यास प्रारंभ झाला. रविवार असल्यामुळे गोव्यातील लोक मोठय़ा प्रमाणात वाहनाने बेळगाव शहरामध्ये खरेदीसाठी जात होते. त्यांची व पर्यटकांची वाहने अडकून पडली. याशिवाय बेळगाव, तेलंगणा भागातून गोव्यात येणारे अनेक पर्यटक, तसेच अन्य वाहने अडकून पडली.
पाच तासांनंतर वाहतूक झाली सुरळीत
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अनेक स्तरावर प्रयत्न करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तोपर्यंत जवळपास पाच तास ही वाहतूक ठप्प होती. याबाबतची माहिती मिळल्यानंतर स्थानिक पोलीस यंत्रणा घटनास्थळी गेली. त्यांनी वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला, मात्र शेकडो वाहने अडकून पडल्याने त्यांच्यामधून सरकारी यंत्रणेला अपघातस्थळापर्यंत पोहोचण्यात अडचण आली, असे सांगण्यात आले.
दोन्ही बाजूने अडकून पडली शेकडो वाहने
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्याच्या दिशेने येणारी कर्नाटक भागातील जवळपास 200 पेक्षा जास्त वाहने अडकून पडली होती, तर गोव्यातून बेळगावच्या दिशेने जाणारी 150 पेक्षा जास्त वाहने अडकून पडली होती. यामध्ये खास करून प्रवासी वाहनांचा समावेश होता. घटना जंगलामध्ये घडल्यामुळे अनेक वाहने जंगलामध्ये अडकून पडली होती, त्यामुळे काही प्रवाशांना जनावरांची भीती वाटू लागली होती, असे काही प्रवाशांनी सांगितले. प्रवाशांनी स्वतःच वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला.
बंदीची अंमलबजावणी करण्यात यंत्रणा अपयशी
या ‘मेगा ब्लॉक’संदर्भात प्रवासीवर्गाने तीव्र संताप व्यक्त केला. जवळपास तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱयांनी गोव्यातून बेळगाव व बेळगावतून गोवा या भागातून अवजड वाहतुकीला पूर्णपणे बंदी घातलेली आहे. मात्र या संदर्भाची अंमलबजावणी पोलीस खाते, वाहतूक पोलीस, वाहतूक खाते यांच्याकडून होत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून सातत्याने या भागामध्ये वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे.
बंदीचे पालन होतेय की नाही, हे पाहणार कोण?
अवजड वाहतुकीस बंदी आदेश असतानाही या भागातून अवजड वाहतूक होत असल्यामुळे सातत्याने टीका होत असते. पोलीस व वाहतूक खात्याची यंत्रणा यांना मोठय़ा प्रमाणात मलिदा मिळतो. तो मलिदा घेऊनच अवजड वाहनांना बिनधास्तपणे सोडले जाते, त्यामुळेच असे अपघात घडतात, असा आरोप प्रवासीवर्गाने केलेला आहे. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाची अंमलबजावणी का होत नाही? याकडे जिल्हाधिकाऱयांचे तरी लक्ष आहे काय? की आदेश दिला म्हणजे त्यांची जबाबदारी संपली? आदेशाचे पालन होतेय की नाही, हे कोणी पहायचे? त्याकडे कोणी लक्ष द्यायचे? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती प्रवासीवर्गाकडून यावेळी झाली.









