मयत दोघेही हन्नीकेरी गावचे, दोन जण जखमी
बाळेपुंद्री/ वार्ताहर
भरधाव वेगाने जाणारा टॅक्टर उलटून रस्त्याशेजारी पडल्याने झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. तर दोघे जण गंभीर जखमी झाले. बैलहोंगल- हिरेबागेवाडी मार्गावरील बैलवाड गावच्या वळणाजवळ शनिवारी सायंकाळी 4 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
सिमेंटच्या वीटा घेऊन जात असताना टॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याचे बैलहोंगल पोलिसांनी सांगितले. बैलहोंगल तालुक्यातील हन्नीकेरी गावचा संतोष मल्लाप्पा मदलूर (वय 17) व करेप्पा लकाप्पा नंदी (वय 66) अशी मयत झालेल्या दोघांची नांवे आहेत. तर रूद्राप्पा ईराप्पा नागनूर (वय 32), पायाप्पा साताप्पा मरेन्नावर (वय 40) अशी गंभीर जखमी झालेल्यांचे नावे असून त्यांना तातडीने बेळगाव येथील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. संतोष मदलूर हा बैलहोंगल येथील कॉलेजमध्ये पीयुसी प्रथम वर्षात शिकत होता.
बैलहोंगल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी ट्रक्टर हन्नीकेरीहून कापूस भरून घेऊन बैलहोंगल येथील एपीएमसीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी गेला होता. सायंकाळी टॅक्टरमध्ये सिमेंटच्या वीटा भरून जात असताना बैलहोंगल- हिरेबागेवाडी मार्गावरील बैलवाड गावच्या वळणाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॉली रस्त्याशेजारील शेतात जाऊन पडली. यात ट्रॉलीवर बसलेले संतोष व करेप्पा हे दोघेही खाली कोसळले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पुढे बसलेला पायाप्पासह चालक रूद्राप्पालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना बेळगाव येथील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
बैलहोंगल पोलीस ठाण्याचे सीपीआय मंजुनाथ कुसगल, पीएसआय एम. हुगार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेची नोंद बैलहोंगल पोलीस ठाण्यात झाली आहे.









