प्रतिनिधी/ सातारा
वाढे, (ता.सातारा) येथे विनायक आबाजी नलावडे यांच्या शेतात ट्रक्टरने काम सुरु असताना चुकून ट्रक्टरचे चाक शेजारील जमीन मालक दत्तात्रय शंकर नलावडे यांच्या शेतात गेले. याचा राग मनात धरुन विनायक नलावडे यांच्यासह त्यांच्या वडिलांना गंभीर स्वरुपाची मारहाण करण्याचा प्रकार घडला. याबाबत सहाजणांविरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी विनायक आबाजी नलावडे हे त्यांच्या शेतात ट्रक्टरने काम करुन घेत होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी दत्तात्रय शंकर नलावडे यांच्या मोकळय़ा शेतात ट्रक्टरचे चाक गेले. या कारणातून सुधीर बाळासाहेब नलवडे, बाळासाहेब नलवडे, दत्तात्रय नलवडे, सचिन उर्फ तानाजी नलवडे सर्व (रा.वाढे) तसेच वैभव निकम (रा.अपशिंगे) व संभाजी घोरपडे रा. मंगळापूर, (ता. कोरगाव) यांनी कुऱहाडीने विनायक नलवडे यांच्यावर वार केले.
यावेळी सुधीर नलवडे याने कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिली तर विनायकचे वडील आबाजी नलवडे यांना गुलाब नलवडे याने लाथाबुक्यांनी मारहाण केली तर टॅक्टरचालक पंकज नलवडे यास दत्तात्रय नलवडे याने धमकी दिली. याबाबत तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी सहाजणांवर गर्दी, मारामारीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार सावंत करत आहेत.









