तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
ट्रकने तुळजापूरकडून अवैधरित्या गुटखा सोलापुरात घेऊन येताना गुन्हे शाखेने सापळा रचून पकडला. यामध्ये 19 लाख 12 हजार 920 किंमतीचा गुटखा व 9 लाख 50 हजार किंमतीचा ट्रक असे 28 लाख 62 हजार 920 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
चालक गुलाम अहमद शेख (वय 27 वर्षे, रा. भातंब्रा, ता. भालकी, जि. बिदर, कर्नाटक), अकमल अकबर शेख (वय 28 वर्षे रा. चिंचोळी, भुयार, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर शहर हद्दीत गुन्हे शाखेकडील पोसई संदीप शिंदे व त्यांचे पथक जुना तुळजापूर नाका परिसरात अवैद्य धंद्याबाबत गोपनीय माहिती काढून कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली. त्या माहितीवरुन ट्रक वाहन (क्र. के. ए. 38/7085) त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा, पान मसाला सुगंधित तंबाखूचे पोते घेऊन तुळजापूरकडून सोलापूरच्या दिशेने येत असल्याचे पोसई शिंदे व त्यांच्या पथकाला आढळून आले. त्यांनी जुना तुळजापूर नाका येथे सापळा लावला असता तोच ट्रक आल्याने त्यास थांबवून वाहन चालक गुलाम अहमद शेख (वय 27 वर्षे, रा. भांतब्रा ता. भालकी जि.बिदर) यांच्याकडे वाहनात कोणता माल आहे, याची चौकशी केली असता गुटख्याचे पोते असल्याचे सांगितले. चालक व साथीदार अकमल अकबर शेख यांना ट्रकसह गुन्हे शाखा कार्यालय व जेलरोड पोलीस ठाणे आवार, सालापूर व अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱयांना बोलावून ट्रकची चौकशी करण्यात आली. या ट्रकमध्ये (क्र. के. ए. 38/7085) गोवा कंपनीचे गुटखा 28 मोठय़ा बॅगा होत्या. प्रत्येक बॅगमध्ये 6 पोती व त्यामधील प्रत्येक पोत्यात 60 पाकिटे असा 19 लाख 12 हजार 920 किंमतीचा गुटखा आढळला. चालक व साथीदार या दोघांवर विरूद्ध अन्न व औषध प्रशसन अधिकारी नसरीन तनवीर मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, गुन्हे शाखेचे पो. नि. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई संदीप शिंदे, पो. ना. विजयकुमार वाळके, पो. शि. अश्रुभान दुघाळ, पो. शि. गणेश शिंदे, पो. शि. सागर गुडं, पो. शि. निंबाळकर यांनी केली.









