वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोना संसर्गाचा प्रभाव हा विविध विभागांवर पडत राहिल्याचे पहावयास मिळत आहे. मागील 15 दिवसांमध्ये या प्रभावाच्या कारणास्तव ट्रक भाडय़ामध्ये जवळपास 5 ते 7 टक्क्यांची घसरण राहिली आहे. तसेच ट्रकच्या अन्य उलाढालीवरही याचा परिणाम होत असल्याची माहिती आहे.
कोरोनाच्या कारणास्तव लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. यामुळे ट्रक व्यवसायावर मोठा नकारात्मक परिणाम होत असून देशातील एपीएमसी बाजारात उष्णतेमुळे फळे, भाज्या आणि गव्हासारख्या साहित्याची आवक 10 ते 15 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नसल्याचे काहीसे चित्र असल्याची माहिती इंडियन फाउंडेशन ऑफ ट्रान्सपोर्ट रिसर्च (आयएफटीआरटी)च्या माध्यमातून देण्यात आली आहे.
कार्गोच्या ऑफर कमीच
आयएफटीआरटीच्या माहितीनुसार कार्गोच्या ऑफरिंगमध्ये घसरण झाल्यामुळे आणि लॉकडाऊनच्या प्रभावामुळे कारखाने व विशेष करुन लहान व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. याचाही परिणाम ट्रक व्यवसायावर झाल्याची माहिती आहे.
65 टक्के रोडवर नाहीच
ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या आकडेवारीनुसार देशातील जवळपास 65 टक्के ट्रक हे रस्त्यावरुन गायब झाले असल्याचे म्हटले आहे. ट्रक उद्योगाला जवळपास 42 हजार कोटी रुपयांचे नुकसान एप्रिलपासून चालू महिन्यापर्यत झाल्याचे सांगितले आहे. जीवनाश्यक वस्तू आणि देशाची लाईफलाईन या स्वरुपात ट्रक उद्योगाला ओळखले जाते. परंतु काही राज्यांच्या प्रतिबंधामुळे सदरचे ट्रक रोडवर धावत नाहीत.
देशातील बहुतांश भाग लॉकडाऊनमध्ये
कोरोनाच्या कारणामुळे देशातील जवळपास 80 टक्के हिस्सा हा लॉकडाऊनमध्ये राहिला आहे. याचा परिणाम म्हणून 95 लाख ट्रकपैकी 55 लाख ट्रक हे रस्त्यावरुन धावत नाहीत. कारण मागणी नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये या उद्योगाला जवळपास 400 कोटी रुपयांचे दररोजचे नुकसान होत आले आहे.









