कोल्हापुर/ प्रतिनिधी
रुग्णालयातील काम आटोपून घरी जाणाऱ्या सुरेश शांतवन माजगांवकर (वय – ५१, रा. पाचगांव) यांच्या दुचाकीला वेगाने येणाऱ्या ट्रकची व्हीनस कॉर्नर चौकामध्ये धडक बसली या अपघातामध्ये सुरेश माजगावकर यांचा ट्रक खाली सापडून जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर नागरिकांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन चोप दिला. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे.
घटनास्थळ व पोलिसांच्याकडून समजलेली हकीकत अशी, करवीर तालुक्यातील पाचगाव येथे सुरेश माजगावकर हे कुटुंबियांसह राहतात. ते नागाळा पार्क परिसरामध्ये असलेल्या केळकर हॉस्पिटल मध्ये काम करतात. मंगळवारी रात्री काम आटपून साडेनऊ वाचण्याच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीवरून पाचगाव येथील घराच्या दिशेने जात होते. त्याच दरम्यान कोकणा मधून कर्नाटकच्या दिशेने जाणारा ट्रक भरधाव वेगाने येत होता. दसरा चौक ओलांडून हा ट्रक वेगाने स्टेशन रोड च्या दिशेने जात होता.
त्याच सुमारास अप्सरा चित्र मंदिराकडून दुचाकीवरुन माजगावकर हे उमा टॉकीज च्या दिशेने जात होते व्हीनस कॉर्नर चौकामध्ये आले असता भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. तसेच राजाराम महाराजांच्या पुतळ्यापासून मलाबार गोल्ड दुकानापर्यंत त्यांना फरफटत नेले या अपघातामध्ये डोक्याला व शरीराला गंभीर इजा झाल्याने रक्तस्त्राव होऊन माजगावकर यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांनी ट्रक चालक अब्दुल रजाक गदक (वय -४४, रा, चलमट्टी उग्गेनकेरी, ता. कलघटगी, जिल्हा -धारवाड) याला पकडून चोप दिला. त्यानंतर एका खासगी रुग्णालयाची रुग्णवाहिका तेथून जात असताना नागरिकांनी आडवली. माजगावकर यांना रुग्णालयात दाखल करण्याची विनंती चालकाकडे केली त्यानंतर कोंडावळ परिसरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक चालक अब्दुल गदक याला ताब्यात घेतले. तसेच सुरेश माजगावकर यांचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. डॉक्टर केळकर यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने कोंडा ओळ येथील रुग्णालयात धाव घेतली. त्यांना कर्मचार्याचा मृत्यू झाल्याबद्दल शोक आनावर झाला.
Previous Articleसोलापुरात बुधवारी ४० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण वाढले
Next Article दुबईहून 155 हवाई प्रवासी दाखल









