बेळगाव ट्रक युनियनचा निर्णय
बेळगाव : डिझेलच्या दरात भरमसाट वाढ होऊनदेखील भाडेवाढ करण्यात येत नसल्याने बेळगावमधील ट्रकचालक बुधवार दि. 11 पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामुळे बेळगावमधून इतर शहरांना होणारी ट्रकची वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्मयता आहे.
दिवसागणिक डिझेलदरात वाढ होत असतानाही भाडे मात्र आहे तेच आहे. त्यामध्ये हमालीचा वाढीव बोजा ट्रक मालकांवर लादण्यात आल्याने व्यवसाय चालवायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मागणी करूनही व्यापाऱयांकडून भाडेवाढ करण्यात येत नसल्याने संपावर जाण्याचा निर्णय बेळगाव ट्रक युनियनने घेतला आहे.
बुधवारी 6 चाकी, 12 चाकी व 14 चाकी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद असेल. याकाळात ट्रकचालकांनी कोणत्याही प्रकारची वाहतूक अथवा स्क्रॅपची वाहतूक करू नये, असे आवाहन युनियनचे अध्यक्ष नंदकुमार लमाणी यांनी केले आहे.









