प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरानजिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावर बंद पडलेल्या ट्रकमध्ये झोपलेल्या ट्रकचालक व क्लिनरला दगडाने मारहाण करत त्यांच्या जवळील 20 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून नेणाऱया तीन चोरटय़ांना सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने जेरबंद केले. यातील एक अल्पवयीन मुलगा असून घटना घडल्यानंतर केवळ पाच तासात त्याचा छडा लावण्याची कामगिरी पोलिसांनी केली आहे.
सुरज राजू माने (वय 22), व तेजस संतोष शिवपालक (वय 21, दोघेही रा. लक्ष्मी टेकडी सदरबझार, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी वाढे फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावर ट्रक बंद पडल्याने रस्त्याच्या कडेला लावून ट्रकचालक भंवरलाल नंदराम सेन (वय 44, रा. सिरोडी, ता. चितोडगड, राजस्थान) व क्लिनर ईश्वर बाबूराव रावत हे झोपले होते. मध्यरात्री 1.30 च्या सुमारास तीन अनोळखी युवकांनी ट्रकचे दोन्ही दरवाजे उघडून ट्रकमध्ये प्रवेश केला. या तीन चोरटय़ांनी फिर्यादी ट्रकचालक व क्लिनर यांना दमदाटी करत त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी फिर्यादी यांनी प्रतिकार केला असता त्यातील एकाने फिर्यादी यांचे डोक्यात दगड घातला. फिर्यादीस जबर दुखापत करुन ट्रकमधील 20 हजार रुपयांची रक्कम घेवून चोरटे मोटारसायकलवरुन पळून गेले.
याबाबत शहर पोलीस ठाण्यात जबरीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ अधिकाऱयांनी तक्रारींमधील वर्णनाच्या चोरटय़ांना पकडण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार डीबीचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम व त्यांच्या पथकाने घटनास्थळावरील माहिती व गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरुन तीन संशयित युवकांना ताब्यात घेतले. सुरवातीस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु सखोल चौकशी केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांना गुह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा घडल्यापासुन काही तासातच सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने संशयित आरोपींना ताब्यात घेवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन.एस. कदम हे करीत आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक दलाल, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, जोतीराम पवार, कॉन्स्टेबल गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग व विशाल धुमाळ यांनी सहभाग घेतला होता.









