प्रतिनिधी/ कुडचडे
काऱयामळ, काले येथे शनिवार 15 रोजी संध्याकाळी दुचाकी आणि ट्रक यांच्यात अपघात होऊन त्यात कुयणामळ, काले येथील दुचाकीचालक विद्या धाकलो वरक (वय 19) हिचा भरलेल्या मालवाहू ट्रकच्या टायरखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेली तिची बहीण जखमी झाली असून तिला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती कुडचडे पोलिसांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच कुडचडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसियोत पाठविला. सदर अपघाताचा पंचनामा निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुण अँड्रय़ू यांनी केला. वाहन कायद्याच्या विविध कलमांखाली सदर ट्रकचा चालक पिएदाद कार्वाल्हो (उगे-सांगे) याला अटक करण्यात आली असल्याची माहिती कुडचडे पोलिसांनी दिली. सदर घटनेनंतर स्थानिकांनी खनिजवाहू वाहनांचा हा मार्ग नसतानाही त्यावरून मालवाहू ट्रक जात असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करून सरपंच, पंच यांना धारेवर धरले.









