प्रतिनिधी/ कराड
शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमधे एकमेकाला संपवण्याचा संघर्ष अद्यापही सुरुच आहे. टोळी युद्धातूनच गुंड अभिनंदन झेंडे याच्यावर हल्ला करण्याचा कट रविवारी सायंकाळी पोलिसांनी उधळला. झेंडेवर कोयता, चाकू, दांडके घेऊन हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने प्रसंगावधान राखत पकडले. त्यांच्याकडून गुह्यात वापरण्यात येणारी हत्यारे हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अनिकेत रमेश शेलार (वय 21, रा. शास्त्राrनगर, मलकापूर), इंद्रजीत हणमंतराव पवार (वय 23, रा. लाहोटीनगर, मलकापूर), सुदर्शन हणमंत चोरगे (वय 22, रा. कोयना वसाहत), आशिष अशोक पाडळकर (वय 33, रा. सनसिटी, मलकापूर, ता. कराड) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीस उपअधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांची उपस्थिती होती. उपअधीक्षक सुरज गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनंदन रतन झेंडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. रविवारी सायंकाळी तो त्याच्या साथीदारांसमवेत कराडच्या शाहू चौकात आला होता. झेंडे केशकर्तनालयात गेल्यानंतर तेथे बाहेर एक पोलो कंपनीची चारचाकी कार येऊन थांबली. कारमध्ये चौघे संशयित हल्लेखोर कोयता, चाकू, दांडकी घेऊन दबा धरून बसले होते. झेंडे केशकर्तनालयातून बाहेर आल्याचे पाहून हल्लेखोर हत्यारांसह बाहेर आले. त्यांनी झेंडेला शिवीगाळ करत त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी झेंडेवर कोयत्याने झेंडेच्या गळ्यावर वार केला; मात्र झेंडेने शिताफीने वार चुकवत तेथील दुकानात पळ काढला. त्याने दुकानाचे दरवाजे आतून बंद करून घेत तत्काळ पोलिसांना फोन केला.
पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. झेंडेने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विजय गोडसे यांनाही फोन केला. गोडसे यांच्यासह हवालदार नितीन येळवे, देवा खाडे, संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, होमगार्ड अमोल जंगम, अक्षय निकम, गणेश खुडे, चंद्रशेखर म्हेत्रे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेत त्यांच्याकडील कोयता, चाकू, दांडकी हस्तगत केली. त्यांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. अभिनंदन झेंडेसह त्याच्या साथीदारांनाही पोलीस ठाण्यात आणले. झेंडे याच्या फिर्यादीवरून चौघांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








