चिकोडी पोलिसांकडून वाहन विक्रीतील गैरव्यवहाराचा पर्दाफाश : दोघांना अटक, तिघे फरार : चोरीची वाहने जप्त
प्रतिनिधी / चिकोडी
आंतरराज्य टोळीकडून चोरी व फसवणूक होत असल्याची माहिती आणि तक्रार चिकोडी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास गतीने व गांभीर्याने करण्यात आला. गेल्या चार महिन्यात डीवायएसपी मनोजकुमार नायक व सीपीआय आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करताना जवळपास 3.5 कोटींची फसवणूक व चोरी केलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून तिघेजण फरार आहेत. येत्या काळात या प्रकरणाचा संपूर्ण तपास लावण्यात पोलिसांना यश येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. लक्ष्मण निंबरगी यांनी येथील पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत कारवाईसंबंधी माहिती दिली. इचलकरंजी येथून 12 लाख रुपयाला युनूस शेख (रा. मच्छिंद्रगड जि. सांगली) याने सिराज सय्यद याला जेसीबी वाहन विकले. त्या व्यवहारातून 50 हजाराचे कमिशन शेख याने मिळवले. मात्र नंतर वाहन नोंद करण्यात अडचणी आल्याने सय्यद याने चिकोडी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत पोलिसांनी राजस्थान, छत्तिसगड व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तपासाची चपे गतिमान केली.
त्या दरम्यान युनूस शेख यांनी बारा लाख रुपयाला जेसीबीचा व्यवहार 50,000 कमिशन घेऊन केला. त्यापैकी सहा लाख रुपये सय्यद यांनी शेख याला दिले. दरम्यान सदर वाहन चिकोडी आरटीओमध्ये नोंदणी करताना अडथळे आले. याशिवाय सय्यद यांनी शेख यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र फोन लागला नाही. त्यामुळे सय्यद यांनी पोलिसात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.
या तपासाला अधिक गती देताना अफजल दिलावर कातकार रा. दांडेली हा बनावट कागदपत्रे तयार करत असल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. वाहन कर्ज न भरणाऱया लोकांची माहिती मिळवणारी एक टोळी, बनावट कागदपत्रे तयार करणारी दुसरी टोळी तर वाहन चोरून विकणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले. या तिन्ही टोळय़ांचा मागोसा घेत 12 वाहने चिकोडी पोलिसांनी जप्त केली आहेत.
या प्रकरणातील युनूस शिराज शेख, अब्दुल करीम साब (रा. तुमकूर), राघवेंद्र रेड्डी या तिघांची कसून चौकशी करण्यात आली. त्यामध्ये सदर फसवणूक करणारे रॅकेट समोर आले आहे. या प्रकरणातील तीन संशयित आरोपी फरार आहेत. त्यांना येत्या काळात लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदर कारवाईत डीवायएसपी मनोज कुमार नायक, एसपी आर. आर. पाटील, एस. आर. अरभावी, जी. एस. कांबळे, एन. एस. बडीगेर, एस. बी. चौगुला, एस. पी. गलगले, राकेश बगली आदी अधिकाऱयांनी सहभाग घेतला.