आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्सविरुद्ध लढत आज
अबु धाबी / वृत्तसंस्था
प्ले-ऑफमधील स्थान यापूर्वीच निश्चित करणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा संघ आज (बुधवार दि. 6) आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरेल, त्यावेळी पहिल्या दोनमध्ये स्थान निश्चित करणे, हे विराट अँड कंपनीसमोर मुख्य लक्ष्य असेल. आपल्या पहिल्यावहिल्या आयपीएल जेतेपदासाठी प्रयत्नशील असणारा आरसीबी संघ 12 सामन्यात 16 गुणांसह गुणतालिकेत तिसऱया स्थानी आहे. आजची लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाईल.
आज येथे विजय संपादन केल्यास शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱया शेवटच्या साखळी सामन्यातही विराटसेनेचे मनोबल उंचावलेले असेल. आरसीबीने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर ते 20 गुणांपर्यंत पोहोचतील आणि त्यांनी पहिल्या दोनमध्ये जागा संपादन करण्याची शक्यता त्यावेळी अधिक असेल.

वास्तविक, दुसऱया टप्प्याच्या प्रारंभी केकेआर व चेन्नईविरुद्ध आरसीबीला 2 पराभव पचवावे लागले होते. पण, नंतर त्यांनी थाटात पुनरागमन करत हॅट्ट्रिक विजय संपादन केले आणि प्ले-ऑफमधील स्थान देखील निश्चित केले.
कर्णधार विराट कोहलीला आतापर्यंत फारशी मोठी खेळी साकारता आली नसली तरी खेळपट्टीवर त्याची फलंदाजी आश्वासक वाटत आली आहे. विराटचा युवा सहकारी सलामीवीर देवदत्त पडिक्कल देखील उत्तम बहरात असून मागील लढतीत त्याने 40 धावांचे योगदान दिले. स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल मात्र दुसऱया टप्प्यात सर्वाधिक आत्मविश्वासाने खेळत असून मागील लढतीत त्याने सलग तिसरे अर्धशतक झळकावले.
तळाच्या स्थानी फलंदाजीला उतरताना एबी डीव्हिलियर्सला फारशी संधी मिळालेली नाही. मात्र, या बदलामुळे वेळ पडल्यास तळाच्या क्रमवारीत आरसीबीकडे महान फलंदाज उपलब्ध असतो आणि अन्य संघ नेहमी याच निकषावर कमी पडत आले आहेत, ही लक्षवेधी बाब आहे. मोहम्मद सिराज, जॉर्ज गॅरटॉन व हर्षल पटेल यांच्यामुळे आरसीबीची गोलंदाजी देखील भक्कम राहिली असून फिरकीच्या आघाडीवर यजुवेंद्र चहल प्रभावी योगदान देत आला आहे.
संभाव्य संघ
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर ः विराट कोहली (कर्णधार), नवदीप सैनी, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिस्तियन, रजत पाटीदार, दुष्मंता चमीरा, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन बेबी, वणिंदू हसरंगा, जॉर्ज गॅरटॉन, यजुवेंद्र चहल, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, काईल जेमिसन, सुयश प्रभुदेसाई, केएस भरत, टीम डेव्हिड, आकाश दीप, एबी डीव्हिलियर्स.
सनरायजर्स हैदराबाद ः केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, शेरफेन रुदरफोर्ड, वृद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, रशिद खान, खलील अहमद, उरमान मलिक, बसिल थम्पी, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, अब्दुल समद, जे. सुचित, जेसॉन होल्डर, विराट सिंग, प्रियम गर्ग, केदार जाधव, मुजीब-उर-रहमान, जेसॉन रॉय.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 पासून.
सनरायजर्स हैदराबादसाठी यंदाचा हंगाम खराब स्वरुपाचा
गुणतालिकेत आठव्या व शेवटच्या स्थानी फेकल्या गेलेल्या सनरायजर्स हैदराबादसाठी यंदाचा हंगाम अतिशय खराब स्वरुपाचा ठरला आहे. त्यांना 12 सामन्यात केवळ दोनच विजय प्राप्त करता आले आहेत. युएईमधील दुसऱया टप्प्यात तर त्यांना 5 पैकी केवळ एकच सामना जिंकता आला आहे. त्यांचे हंगामातील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले असले तरी उर्वरित दोन्ही सामने जिंकून हंगामाची सांगता करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
हैदराबादने 2016 मध्ये जेतेपद मिळवून देणाऱया वॉर्नरला कर्णधारपदावरुन डच्चू दिला व ही धुरा केन विल्यम्सनकडे सोपवली. पण, यानंतरही फारसा फरक पडला नाही. फलंदाजी ही हैदराबादची सर्वात कमकुवत बाजू ठरत आली असून बेअरस्टोची गैरहजेरी त्यांना प्रकर्षाने जाणवत राहिली आहे.
गोलंदाजीत जेसॉन होल्डरवरच त्यांची भिस्त राहिली असून त्याने बऱयाचदा हा विश्वास सार्थ ठरवला. मात्र, भुवनेश्वर कुमार व सिद्धार्थ कौल यांनी सातत्याने निराशा केली आहे. युवा काश्मिरी क्रिकेटपटू उमरान मलिकने केकेआरविरुद्ध आयपीएल पदार्पणात प्रभावी गोलंदाजी साकारली. मात्र, त्याला आपल्या कौशल्यावर अद्याप बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. लेगस्पिनर रशिद खान हाच हैदराबादचे मुख्य अस्त्र असेल, हे जवळपास स्पष्ट आहे.









