वृत्त संस्था/ बँकॉक
रविवारी येथे झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूरच्या अंतिम बॅडमिंटन स्पर्धेत तैवानची तेई झु ईंग तसेच डेन्मार्कचा अँडर्स अँटोनसेन यांनी अनुक्रमे महिला आणि पुरूष एकेरीतील अजिंक्यपदे पटकाविली. ईंगने अंतिम सामन्यात स्पेनच्या ऑलिंपिक विजेत्या कॅरोलिना मॅरीनचा तर अँटोनसेनने आपल्याच देशाच्या ऍक्सलसेनचा पराभव केला.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मॅरीनने पहिला गेम 21-14 असा जिंकला. पण त्यानंतर ईंगने पुढील दोन गेम्स 21-8, 21-19 असे जिंकून मॅरीनचे आव्हान संपुष्टात आणले. 26 वर्षीय ईंगला दोन आठवडय़ापूर्वी बँकॉकमध्ये झालेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सलग दोनवेळा मॅरीनने पराभूत केले होते पण ईंगने यावेळी मॅरीनच्या गेल्या तीन आठवडय़ाच्या कालावधीतील जेतेपदाची हॅट्ट्रीक रोखली. रविवारच्या अंतिम सामन्यात ईंग आणि मॅरीन यांच्यात किरकोळ शाब्दीक चकमक झाली पण या दोघींनी माईंड गेम्स खेळण्यावर भर दिल्याचे जाणवले. थायलंडने अलिकडच्या तीन आठवडय़ाच्या कालावधीत जैविक सुरक्षाचे पालन करत तीन सलग बॅडमिंटन स्पर्धा यशस्वीपणे भरविल्या. सदर स्पर्धा प्रेक्षकविना खेळविल्या गेल्या.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसेनने आपल्याच देशाच्या चौथ्या मानांकित व्हिक्टर ऍक्सलसेनचा 16-21, 21-5, 21-17 अशा गेम्समध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. ऍक्सलसेनने यापूर्वी येथे झालेल्या दोन स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविले होते. अँटोनसेनने ऍक्सलसेनची जेतेपदाची हॅट्ट्रीक हुकविली.
या अंतिम स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद कोरियाच्या चौथ्या मानांकन जोडीने पटकाविले. ही अंतिम लढत कोरियाच्या खेळाडूमध्ये झाली. चौथी मानांकित जोडी ली सो ही आणि शीन सेयुंग चेन यांनी आपल्याच देशाच्या सहावी मानांकित जोडी किम यांग आणि काँग यंग यांचा 15-21, 26-24, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव केला. हा अंतिम सामना दीडतास चालला होता.
तैवानची सातवी मानांकित जोडी ली याँग आणि वेंग ची लीन यांनी अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या मोहम्मद एहसान आणि सेटीवान यांचा 37 मिनिटांच्या कालावधीत 21-17, 23-21 अशा गेम्समध्ये पराभव करत पुरूष दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. गेल्या तीन आठवडय़ाच्या कालावधीतील तैवान याँग आणि लीन यांचे हे पुरूष दुहेरीतील तिसरे विजेतेपद आहे.









