28 प्रकल्प बंद ठेवणार कंपनी
रबरी ग्लोव्ह्ज तयार करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी टॉप ग्लवने स्वतःचे निम्म्याहून अधिक प्रकल्प बंद करण्याचा निणंय घेतला आहे. मलेशियाच्या या कंपनीचे 2400 पेक्षा अधिक कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कंपनीने स्वतःचे 28 प्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्प कधीपासून बंद करण्यात येणार हे स्पष्ट नाही, परंतु अनेक टप्प्यांमध्ये याची अंमलबजावणी होणार आहे.
कंपनीचे प्रकल्प आणि डॉरमेट्री असलेल्या भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली होती. टॉप ग्लवच्या एकूण 5800 कर्मचाऱयांची चाचणी करण्यात आली असता 2453 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बहुतांश कर्मचारी नेपाळचे
टॉप ग्लवचे मलेशियात 41 प्रकल्प आहेत. यात बहुतांशी नेपाळचे नागरिक काम करतात आणि गर्दीयुक्त भागांमध्ये राहतात. सर्व बाधित कर्मचाऱयांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना विलगीकृत करण्यात आल्याची माहिती डायरेटक्र जनरल ऑफ हेल्थ नूर हिशाम अब्दुल्ला यांनी दिली आहे.
विक्रमी नफा
टॉप ग्लवने यंदा विक्रमी नफा प्राप्त केला आहे. कोरोनाच्या प्रारंभापासूनच कंपनीच्या उत्पादनांची मागणी प्रचंड वाढली होती. या कंपनीत बहुतांशी कमी पगारावर काम करणारे स्थलांतरित मजूर आहेत. कंपनीवर या कामगारांच्या शोषणाचाही आरोप आहे. जुलै महिन्यात अमेरिकेने याच कारणामुळे टॉप ग्लवच्या दोन उपकंपन्यांकडून आयात करण्यास बंदी घातली होती.