वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेले भारताचे दोन मल्ल आणि चार नौकानयनपटू अशा एकूण सहा ऍथलिटस्चा टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्किममध्ये (टीओपीएस) समावेश करण्यात आला आहे.
टीओपीएसच्या कोअर गटामध्ये भारताचे महिला मल्ल अन्शू मलिक (57 किलो गट), सोनम मलिक (62 किलो गट) यांचा समावेश आहे. आशियाई कुस्ती स्पर्धेतून अन्शू आणि सोनम यांनी आपली ऑलिम्पिक पात्रता सिद्ध केली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केलेल्या भारताच्या चार नौकानयनपटूंचा यामध्ये सहभाग आहे. ऑलिम्पिकसाठी नौकानयन या प्रकारात पात्र ठरणारी नेत्रा कुमानन ही भारताची पहिली महिला नौकानयनपटू आहे. त्याचप्रमाणे विष्णू सर्वानन, वरुण ठक्कर, के. सी. गणपती या पुरुष नौकानयनपटूंनी पात्र फेरीच्या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली आहे.









