वर्षभरात गुंतवणूकदारांना मिळाला भरघोस लाभ
नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमधील दिग्गज कंपनी टेस्ला यांच्या समभागांनी गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा दिला आहे. मंगळवारी समभागांनी 6.43 टक्क्यांची तेजी प्राप्त केली असल्याचे दिसून आले. समभागांनी गुंतवणूकदारांना आतापर्यंत 550 टक्क्यांचा सकारात्मक परतावा दिला आहे. तेजीचा प्रवास करणाऱया कंपनीचे बाजारमूल्य प्रथमच 39.97 लाख कोटी रुपयांच्या (500 अब्ज डॉलर) घरात पोहोचले आहे. टेस्लाची ही कामगिरी रिलायन्स इंडस्ट्रीज बाजारमूल्यापेक्षा तीनपट अधिक राहिली आहे.
ब्लूमबर्गच्या माहितीनुसार मागील आठवडय़ात टेस्लाचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले. दुसरीकडे टेस्लाचे समभाग डाउजोंस निर्देशांकामध्ये चालू वर्षातील 21 डिसेंबरला समावेश होणार आहेत.
एलॉन मस्कच्या संपत्तीत वाढ
समभागातील वधारत चाललेल्या प्रवासामुळे टेस्लाचे सह संस्थापक एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती 2020 मध्ये आतापर्यंत 7.99 लाख कोटीने वाढली आहे. तसेच ब्लूमबर्गच्या निर्देशांकानुसार मस्क यांची संपत्ती 10 लाख कोटी रुपयांवर पोहोचली. बाजार बंद झाल्यानंतर नॅसडॅकमध्ये टेस्लाचे बाजारमूल्य 38.94 लाख कोटीवर राहिले. ही कामगिरी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजारमूल्यापेक्षा तीन पटीने अधिक आहे.









