बेजोस 2017 मध्ये होते जगातील सर्वाधिक श्रीमंत
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणारी कंपनी टेस्ला इंक आणि स्पेसएक्सचे प्रमुख आणि सीईओ एलॉन मस्क हे आता जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. यांची एकूण संपत्ती गुरुवारी (न्यूयॉर्कमधील वेळेनुसार सकाळी 10.15 मी) 188 अब्ज डॉलर्सची झाली आहे. टेस्लाचे समभाग हे बाजारात गुरुवारी तेजीत राहिले होते. एलॉन मस्क यांनी धनाढय़ाच्या यादीत सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे.
ऍमेझॉनचे बेजोस दुसऱया स्थानी
श्रीमंतांच्या यादीमध्ये बुधवारपर्यंत सर्वाधिक पुढे असणारे ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आता दुसऱया स्थानावर घसरले आहेत. ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्सच्या माहितीनुसार बुधवारी बेजोस यांची संपत्ती 184 अब्ज डॉलर्स आणि मस्क यांची संपत्ती 181.1 अब्ज होती. मात्र बेजोस ऑक्टोबर 2017 मध्ये जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर होते.
एलॉन मस्क यांच्याकडे टेस्लाचे 20 टक्के समभाग आहेत. या व्यतिरिक्त त्यांना ईसॉपच्या आधारे 2012 आणि 2018 मध्ये काही समभाग मिळणार आहेत. याचे मूल्य सध्या जवळपास 40 अब्ज डॉलर्स आहे.
वर्षभरात सहा पटीने वाढ
वय वर्ष 49 असणारे मस्क यांची संपत्ती मागील एक वर्षात जवळपास सहा पटीने वधारली आहे. एक वर्षाच्या अगोदर मस्क यांची संपत्ती जवळपास 30 अब्ज डॉलर्स होती. यामध्ये एक वर्षामध्ये 150 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकने वाढ झाली आहे. इतिहासातील ही घटना पहिली असून सर्वात वेगाने संपत्ती जमा केल्याची माहिती आहे. याच दरम्यान टेस्लाचे समभागाचे भाव जवळपास 750 टक्क्यांनी वधारले आहेत.
मस्क यांना पैशामध्ये रुची नाही
सध्या जगातील सर्वात धनाढय़ व्यक्ति म्हणून ओळख प्राप्त केलेले मस्क यांना मात्र वास्तवामध्ये पैशांमध्ये कोणतीही रुची नसल्याची माहिती आहे. टेस्ला आणि स्पेस एक्समधील हिस्सेदारी व्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची अन्य संपत्ती नाही.









