ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, केरळ, तामिळनाडू, पंजाब आणि गुजरातमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची ही दुसरी लाट वेळीच रोखण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे काटेकोर पालन, तसेच टेस्ट, ट्रॅक आणि ट्रिट हि त्रिसूत्री पुन्हा वापरण्याची गरज आहे. कोरोनाने सर्वात प्रभावित राज्यांमध्ये आरटीपीसीआर टेस्टिंग 80 टक्क्यांच्या वर असणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
कोरोनाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मोदी म्हणाले, देशातील कोरोनाची दुसरी लाट वेळीच रोखण्याची गरज आहे. त्यासाठी टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट ही त्रिसूत्री पुन्हा वापरण्याची गरज आहे. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक आहे.
टिअर-2 आणि टिअर-3 शहरांच्या आसपासचे क्षेत्र अधिक प्रभावित होऊ लागले आहे. ग्रामीण भागात कोरोना वाढला तर त्याला रोखणे कठीण होईल. तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि उत्तरप्रदेशात लस वाया जाण्याचे प्रमाण 10 टक्के आहे. तर काही राज्यांमध्ये लसी वापराविना पडून असल्याने मोदींनी चिंता व्यक्त केली.









