टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाची मोठी भूमिका पुरुषाच्या आयुष्यात, प्रत्येक टप्प्यावर असते. पुरुषाच्या
स्नायूंमधील बदल, दाढी उगवणे, आवाज जड होणे, केसांचा विकास, स्त्रीसंगाची क्षमता, कामुकता आदी सर्व गोष्टी याच संप्रेरकाच्या माध्यमातून नियंत्रित केल्या जातात. अनेकांना आपल्या शरीरात या संप्रेरकाचे प्रमाण कमी आहे असे वाटते. परंतु काही उपायांच्या माध्यमातून या संप्रेरकात वाढ करता येते.
टेस्टोस्टेरॉन हे पुरुषत्वाचे संप्रेरक मानले जाते. याच संप्रेरकाच्या निर्मितीनंतर व्यक्तीच्या शरीरात पुरुषी बदल होऊ लागतात, हे त्यामागील कारण होय. शास्त्रज्ञ याला ‘मेल सेक्स हार्मोन’ असे म्हणतात. अर्थात, महिलांमध्येही टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक आढळते; मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प असते. पुरुषाच्या अंडकोशात हे संप्रेरक तयार होते. टेस्टोस्टेरॉनची कमतरता असल्यास उपयुक्त ठरणारे काही उपाय खालीलप्रमाणे.

व्यापक स्तरावर केलेल्या अभ्यासाच्या आधारे शास्त्रज्ञांनी असे सांगितले आहे की, टेस्टोस्टेरॉन वाढविण्यासाठी सर्वांत उपयुक्त उपाय म्हणजे व्यायाम. त्यामुळेच जे पुरुष नियमित व्यायाम करतात, त्यांचे स्नायू आणि शरीराचा आकार प्रमाणबद्ध झाल्याचे दिसते आणि त्यांची क्षमताही वाढल्याचा अनुभव येतो. ‘रेझिस्टन्स ट्रेनिंग’ म्हणजे वजन उचलण्यासारखे व्यायाम केल्यास टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाच्या प्रमाणात वाढ होते.
अति खाण्यामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. त्याचप्रमाणे प्रथिनयुक्त, आरोग्यवर्धक पदार्थांचे सेवन अधिक
प्रमाणात केल्यास टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. कार्बोहायड्रेट्स आणि उत्तम प्रतीचे स्निग्ध पदार्थ टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत वाढ करू शकतात. त्यामुळे आपल्या आहारात अशा पदार्थांचा अंतर्भाव करावा, जेणेकरून फॅट्स,
कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचा समतोल राखला जाईल.
एका अध्ययनानुसार, अश्वगंधाचे सेवन केल्याने टेस्टोस्टेरॉनची पातळी 17 टक्के तर वीर्याचे प्रमाण 167 टक्क्यांपर्यंत वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे अन्य एका संशोधनात आल्याचा अर्कसुद्धा टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढण्यास उपयुक्त असतो असे आढळले आहे. अर्थात, आल्यावर करण्यात आलेले बहुतांश प्रयोग प्राण्यांवर करण्यात आले आहेत. परंतु आल्याचे अनेक फायदे असतात, हे लक्षात घेऊन रोजच्या आहारात आल्याचा समावेश करावा. अर्थातच प्रकृती पाहून !
बारा महिने सुरू असलेल्या एका संशोधनांती शास्त्रज्ञांनी असे नमूद केले की, रोज थोडा वेळ उन्हात बसल्यामुळे टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाची निर्मिती 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्याच आधारावर शास्त्रज्ञांनी या प्रक्रियेला नैसर्गिक टेस्टोस्टेरॉन वर्धक
मानले आहे. शहरांमध्ये बहुतांश लोक उन्हापासून बचाव करताना दिसतात. त्यामुळे शहरांच्या तुलनेत खेडेगावातील पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण अधिक असते. दररोज सकाळी जेव्हा ऊन सौम्य असते तेव्हा थोडा वेळ उन्हात बसणे आणि व्यायाम करणे फायद्याचे ठरते.
शरीरासाठी झोप ही एक आवश्यक प्रक्रिया आहे. परंतु आजकाल लोकांचा दिनक्रम अत्यंत वाईट बनला आहे. चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम आणि आहार जितका आवश्यक आहे, तितकीच झोपही आवश्यक आहे. एका अध्ययनानुसार, जे लोक दिवसाकाठी चार तास किंवा त्याहून कमी झोप घेतात, त्यांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी बरीच घटते. याच संशोधनात असे आढळले आहे की, दर एक तासाची झोप शरीरातील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण 15 टक्क्यांनी वाढवीत असते. त्यामुळे दिवसाकाठी सात ते नऊ तास झोप घेणे अत्यावश्यक आहे.









