टेलिव्हिजन आणि नाटक या दोन्ही माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी अभिनेत्री प्रिया मराठे ही नुकतीच झी युवावरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
या भूमिकेबद्दल त्यांनी सांगितले की, मी ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत नचिकेतची आई इरावती देशपांडेची भूमिका साकारतेय. मी कधीही कुठली भूमिका स्वीकारताना त्या रोलला आणि त्या पॅरेक्टरला जास्त महत्व देते. मी याआधी देखील आईची भूमिका टेलिव्हिजनवर साकारली आहे, त्यामुळे आईचा रोल करणं हे मला कुठेच कमीपणाचं नाही वाटत. जर त्या भूमिकेचं कथेतील महत्व जास्त असेल तर ती भूमिका करणं मला आवडतं. मी कधीच कुठलीही भूमिका मला किती जास्त वेळ साकारायला मिळेल किंवा त्या व्यक्तिरेखेचं दिसणं कसं असेल याला जास्त महत्व दिलं नाही आहे. माझ्यासाठी त्या भूमिकेचं कथेतील स्थान जास्त महत्वाचं असतं, जेणेकरून मला तिथे अभिनयासाठी जास्त चांगला वाव मिळेल. त्यांनी पुढे सांगितले की, इरा लग्नानंतर ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहे. ती एक मॉडर्न आई आहे आणि परदेशात राहिल्यामुळे तिची विचारसरणीदेखील मॉडर्न आहे. तिची इंग्लिश बोलण्याची, शब्द उच्चारण्याची पद्धत वेगळी आहे. तसंच इरा ही खूप कॉन्फिडन्ट आहे त्यामुळे मी तिची भूमिका साकारत असताना माझ्या बॉडीलँग्वेजकडे ही खूप लक्ष देतेय. भूमिका स्वीकारताना ती भूमिका काय आणि किती महत्वाची आहे यांच्याकडे माझा लक्ष असतो. जर भूमिका खूप प्रभावी असेल तर व्यक्तिरेखेचं वय माझ्यासाठी महत्वाचं नसतं. ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेत मी साकारत असलेली इराची भूमिका मालिकेत खूप अनपेक्षित वळण घेऊन येणार आहे आणि या भूमिकेबद्दलची हीच गोष्ट मला जास्त आवडली. मला स्वतःला असं वाटतं की टेलिव्हिजवरील एका आईची इमेज ही बदलली पाहिजे. माझ्या वयाच्या असलेल्या आई जेव्हा मी खऱया आयुष्यात पाहते तर त्या मॉडर्न असतात, मॉडर्न कपडे घालतात, त्यांना सगळं ठाऊक असतं, त्यांचं वागणं फारसं खूप मोठय़ा माणसांसारखं नसतं, त्यांना बघून त्या 20 वर्षाच्या मुलाची आई वाटत नाहीत आणि अशीच आई मी पडद्यावर साकारतेय.
प्रिया मराठेने सांगितले की, मी भूमिकेच्या कथेतील स्थानाला जास्त महत्व देते. त्यामुळे मी या आधी अनेक प्रकारच्या आणि विविध शैलीतील भूमिका साकारल्या आहेत. पण ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण हा एक लाईटहार्टेड कॉमेडी ड्रम आहे. ही शैली मुळात खूप आव्हानात्मक आहे. मी अशाप्रकारच्या जॉनरमध्ये आधी जास्त काम केलं नाही आहे. यात अंगविक्षेप करून हसवण्यापेक्षा छोटय़ा छोटय़ा घटनांमधून विनोदनिर्मिती करून प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं असतं. त्यामुळे ही भूमिका साकारताना मी माझे 100 टक्के देणार आहे.









